छत्रपती संभाजीनगर – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ५ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर मराठा समाजाच्या वतीने उपोषण चालू करण्यात आले आहे.
गंगापूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार सतीश सोनी यांना मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गंगापूर तालुक्यातील प्रत्येक गावात ३ दिवस ‘साखळी उपोषण’ करण्यात येणार आहे. ३ दिवसांत मागण्या मान्य न केल्यास ‘आमरण उपोषण’ करण्याची चेतावणी देण्यात आली आहे. ‘शिवबा’ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पाठे हे कायगाव येथील स्व. काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस्थळाजवळ उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता.