साक्षरतेचा घसरता दर !

महाराष्‍ट्रात वर्ष २०११ च्‍या जनगणनेनुसार १ कोटी ६३ लाख लोक निरक्षर आहेत. यात सर्वाधिक १० लाख ६७ सहस्र ८२३ एवढे निरक्षर हे ‘विद्येचे माहेरघर’ म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या पुणे जिल्‍ह्यातच असल्‍याची गोष्‍ट उघडकीस आली आहे. यातून प्रचलित शिक्षणव्‍यवस्‍थेचे अपयश दिसून येते. ‘ब्रिटीशपूर्व काळातील भारत हा ज्ञानार्जनाच्‍या, म्‍हणजे शिक्षणाच्‍या शिखरावर होता. शिक्षणव्‍यवस्‍थेत आशियातच नव्‍हे, तर युरोप खंडातही अग्रणी होता. त्‍या काळी भारतात कुणीच निरक्षर नव्‍हते. भारताच्‍या जनगणनेने वर्ष २०११ मध्‍ये सरासरी साक्षरता दर ७३ टक्‍के असण्‍याचा अंदाज वर्तवला आहे. ‘सध्‍या शिक्षणाच्‍या संदर्भात भारताची स्‍थिती इतकी दयनीय का झाली ?’, याचे विचारमंथन होणे आवश्‍यक आहे. शिक्षणक्षेत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांना समाज कल्‍याण विभाग योजनेच्‍या अंतर्गत शिष्‍यवृत्ती दिली जाते. या योजनेमधून अनुसूचित जातीच्‍या ५ वी ते १० वीमध्‍ये असणार्‍या विद्यार्थ्‍यांना १ सहस्र, तसेच विमुक्‍त जाती आणि भटक्‍या जमाती प्रवर्गातील ५ वी ते ७ वीच्‍या विद्यार्थ्‍यांना ५०० रुपये शिष्‍यवृत्ती देण्‍यात येते. राज्‍यातील ६ ते १४ वयोगटांतील मुलांना विनामूल्‍य आणि सक्‍तीचे शिक्षण देण्‍यासाठी ‘शिक्षण हक्‍क कायदा’ असतांनाही महाराष्‍ट्रात एवढे निरक्षर आहेत. निरक्षरता न्‍यून करण्‍यासाठी ‘साक्षर भारत’ योजना राबवण्‍यात येत आहे. वर्ष २०१६-१७ मध्‍ये राज्‍य सरकारचा प्राथमिक शिक्षणावरील खर्च १९ सहस्र ४८६ कोटी इतका होता. तरीही ‘निरक्षरतेचे प्रमाण का वाढत आहे ?’, याचा गांभीर्याने विचार व्‍हायला नको का ?

‘इंग्रज भारतात येण्‍यापूर्वी भारतामध्‍ये ७ लाख ३२ सहस्र गुरुकुले होती. ९७ टक्‍के लोक सुशिक्षित होते. गुरुकुलात ‘आरक्षण’ नव्‍हते आणि सर्व वर्णियांसाठी शिक्षण होते. मेगॉस्‍थेनिस (ख्रिस्‍तपूर्व ३०२ मध्‍ये) भारतात आलेल्‍या प्रवासी येथील शिक्षणव्‍यवस्‍थेने विलक्षण प्रभावित झाला होता. देशाच्‍या सर्वांगीण विकासासाठी उच्‍च साक्षरता आवश्‍यक आहे. भारतीय शिक्षणपद्धत सध्‍या पाश्‍चात्त्यांच्‍या शिक्षणाचे अनुकरण करत असल्‍याने  ती दोषयुक्‍त झाली आहे. भारत स्‍वतंत्र झाल्‍यानंतर मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धत पालटली असती, तर आपल्‍या देशाची अशी दुःस्‍थिती झाली नसती. निरक्षरतेचे प्रमाण न्‍यून करण्‍यासाठी प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीला खर्‍या अर्थाने गतवैभव प्राप्‍त करून देणे अपरिहार्य !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे.