शासनाच्या आदेशानंतर मोहोळ, पंढरपूर, माढा येथे धाडी
सोलापूर – जिल्ह्यात प्रतिदिन १२ लाख ७९२ लिटर दूध संकलन होते. त्यातील ५ लाख ५०० लिटर दुधाचे संकलन होत असलेल्या प्रकल्पाची जिल्हा प्रशासनाकडे नोंदच नाही. त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. यावर उपाय म्हणून अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी धाडी घातल्या जात आहेत. त्यात आतापर्यंत ९ ठिकाणच्या दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत; परंतु नोंदणीच नसलेल्या प्रकल्पांमधून निम्मे दूध विक्रीसाठी बाहेर पडत असल्याने भेसळ रोखण्यासाठी अशा प्रकल्पांपर्यंत पोचण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. (‘ज्या प्रकल्पाची दुग्ध विकास अधिकारी कार्यालयात नोंद नाही, त्या आस्थापनांवर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असतांना आतापर्यंत प्रशासन काय करत होते ?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास चूक ते काय ? – संपादक)
नोंदणी नसलेल्या प्रकल्पांमध्ये दैनंदिन दूध संकलन !
१. सांगोला (१ लाख ७६ सहस्र लिटर)
२. मंगळवेढा (६१ सहस्र ३०० लिटर)
३. मोहोळ (७१ सहस्र लिटर)
४. पंढरपूर (४८ सहस्र २०० लिटर)
यापूर्वी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या तालुक्यांमध्ये पकडण्यात आलेल्या दुधामध्ये युरिया, निळी, स्टार्च आदी पदार्थ आढळून आल्याचा अहवाल जाहीर झाला होता. |