|
पणजी, २० ऑगस्ट (वार्ता.) – ‘पणजी स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची कामे राज्य सरकारमधील काही महत्त्वाच्या खात्यांकडून संमती मिळण्यास विलंब झाल्याने रखडली आहेत. ‘पणजी स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या अंतर्गत १ सहस्र ५३ कोटी ८० लाख रुपये किमतीची ४९ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली होती, तर यामधील केवळ निम्मे प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. २३ प्रकल्पांची ६७० कोटी रुपये किमतीची कामे रखडली आहेत. ही माहिती केंद्राने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात दिली आहे.
केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, मिरामार येथील ६ कोटी ३० लाख रुपये किमतीचा ‘स्मार्ट पार्किंग प्रकल्प’ हा प्रकल्प राबवणार्या सार्वजनिक बांधकाम खात्याला विजेवरील वाहनांच्या चार्जिंगसाठीचे केंद्र ही सुविधा उभारण्यास आवश्यक अनुज्ञप्ती न मिळाल्याने हे काम रखडले आहे, तसेच ‘मांडवी प्रोमनेड’ हा ४० कोटी ९० लाख रुपये किमतीचा प्रकल्प गोवा समुद्रकिनारपट्टी विभागीय व्यवस्थापन प्राधिकरण, वन विभाग आणि पर्यटन विभाग यांचा ‘ना हरकत दाखला’ न मिळाल्याने रखडला आहे. मिरामार समुद्रकिनारा ते ‘ई.एस्.जी.’ प्रकल्प येथे पदपथाचे काम मिरामार येथील एका हॉटेलने बंद पाडले आहे. प्रकल्पासाठी हॉटेलकडून ‘ना हरकत’ दाखल्याची प्रतीक्षा आहे. सांतईनेझ नाल्याच्या ४१ कोटी १० लाख रुपये खर्चून करण्यात येणारे सुशोभीकरणाचे काम भूमीच्या मालकांचा ‘ना हरकत’ दाखला न मिळाल्याने रखडले आहे.