भगवान परशुराम हेच गोव्‍याचे निर्माते, तर छत्रपती शिवाजी महाराज आराध्‍यदैवत ! – सत्‍यविजय नाईक, दक्षिण गोवा समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘शांत गोव्‍याला संवेदनशील प्रदेश बनवण्‍याचे षड्‍यंत्र ?’

श्री. सत्‍यविजय नाईक

पणजी – गोव्‍यात ‘इन्‍क्‍विझिशन’ची (धर्मच्‍छळाची) मागणी करणारे सेंट फ्रान्‍सिस झेवियर हे ‘गोंयचो सायब’ (गोव्‍याचे निर्माते) कसे ? भगवान परशुराम हेच गोव्‍याचे निर्माते, तर छत्रपती शिवाजी महाराज हे गोव्‍याचे आराध्‍यदैवत आहेत. विशिष्‍ट समाज गोव्‍याची प्रतिमा हेतूपुरस्‍सर कलुषित करू पहात आहे; पण आज हिंदु समाज जागरूक झाला आहे आणि तो अशा विरोधाला सक्षमपणे तोंड देत आहे, असे उद़्‍गार हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्‍वयक श्री. सत्‍यविजय नाईक यांनी काढले. समितीने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्‍या ‘शांत गोव्‍याला संवेदनशील प्रदेश बनवण्‍याचे षड्‍यंत्र ?’, या विशेष संवादात ते बोलत होते.


गोव्‍यात हिंदूंमध्‍ये नवचैतन्‍य निर्माण होत असल्‍याचे विविध घटनांमधून उघड ! – प्रशांत वाळके, अध्‍यक्ष, स्‍वराज्‍य गोमंतक संघटना

श्री. प्रशांत वाळके

गोव्‍यात हिंदु समाजात अल्‍पावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या प्रेरणेने नवचैतन्‍य निर्माण होत आहे. गेल्‍या २ वर्षांत गोव्‍यात हा पालट झालेला आहे आणि हा एक दैवी चमत्‍कार आहे. मागील २० वर्षांत न घडलेले आता मागील २ ते ३ वर्षांत घडत आहे. गोव्‍यात छत्रपती शिवाजी महाराज हा एक भावनात्‍मक विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आघात झाल्‍यास ५०० ते १ सहस्र लोक रस्‍त्‍यावर उतरतात. ही लहान गोष्‍ट नाही. हिंदूंमध्‍ये नवचैतन्‍य निर्माण झाल्‍याचे हे द्योतक आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रेरणेमुळे हिंदूंमधील क्षात्रतेज जागृत होत आहे ! – जयेश थळी, सचिव, गोमंतक मंदिर महासंघ

श्री. जयेश थळी

गोव्‍यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍या घटना एखाद्या शृंखलेनुसार घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्‍याची विटंबना ही ‘दारूच्‍या नशेत केली’, ‘मानसिक संतुलन बिघडल्‍याने केली’, अशी वृत्ते आता झळकू लागली आहेत. वास्‍तविक विरोधकांना छत्रपती शिवाजी महाराज हेच मानसिकदृष्‍ट्या अडथळा वाटत आहे. हिंदु समाजाला सातत्‍याने दबावाखाली ठेवण्‍यात आले आणि आता मात्र हिंदूंमधील क्षात्रतेज जागृत होऊन ते कृतीशील होऊ लागले आहेत.