नाशिक – अधिक मास समाप्तीनंतर श्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण मासात भाविकांची अलोट गर्दी असते. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांनी दर्शनासाठी मंदिर प्रतिदिन पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत, तर एकूण ४ श्रावणी सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले असणार, असा निर्णय घेतला आहे.
१. भाविकांना वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सहस्रो भाविक दर्शनासाठी उभे राहू शकतील.
२. ज्येष्ठांना या दर्शनरांगेत बसण्याची व्यवस्था असून पिण्याचे पाणी, तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष सिद्ध करण्यात आला आहे. स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी’ कक्ष उपलब्ध केला आहे.
३. त्र्यंबकेश्वरच्या गावकर्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. सकाळी मंदिर उघडल्यापासून १०.३० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा समवेत ठेवावा लागेल. देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजातून चालू होईल.
‘भाविकांनी अल्प सामान आणावे. मौल्यवान वस्तू आणू नयेत. मंदिरात पिशव्या नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणतीही बेवारस किंवा संशयित वस्तू आढळल्यास तिला स्पर्श न करता पोलिसांच्या निदर्शनास आणावे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्यास याची माहिती पोलिसांना द्यावी. भाविकांनी आपली वाहने वाहनतळाच्या ठिकाणीच उभी करावीत. यात्रेत कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कुणी जाणून-बुजून अफवा पसरवत असल्यास तसे पोलिसांना तात्काळ कळवण्यात यावे’, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.