वाहनतळ हवे !

दिवसेंदिवस शहरांची लोकसंख्‍या जशी वाढत आहे, तशी वाहनांची संख्‍याही वाढत आहे. आज प्रत्‍येकाच्‍या दारात एकतरी दुचाकी उभी आहे. जिल्‍ह्यातील शहरालगत असणार्‍या आजूबाजूच्‍या उपनगरांतून प्रशासकीय कामासाठी येणार्‍या नागरिकांची संख्‍याही अधिक आहे. वाहनतळाच्‍या अभावी लांबून येणार्‍या नागरिकांची अनेक प्रशासकीय कार्यालये किंवा अन्‍य कार्यालये यांच्‍याबाहेर गैरसोय होते. वाहनतळ नसल्‍याने वाहनधारकांना उपलब्‍ध ठिकाणी वाहने लावावी लागतात. त्‍यामुळे नागरिक, पादचारी, अन्‍य वाहनचालक आदींनाही त्‍याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो.

उदाहरणच द्यायचे झाले, तर सातारा तहसील कार्यालयात नागरिकांची नेहमीच वर्दळ असूनही वाहनधारकांसाठी वाहनतळाची कोणतीही व्‍यवस्‍था नाही. वास्‍तविक सातारा तहसील कार्यालयाचा परिसर मोठा आहे; मात्र अवैधरित्‍या वाळू उत्‍खनन करणारे ट्रक, टेम्‍पो, ट्रॅक्‍टर-ट्रॉली आणि इतर साहित्‍य यांच्‍यावर कारवाई करून तहसील परिसरात ठेवल्‍यामुळे मोकळी जागाच शिल्लक राहिलेली नाही. यामुळे अनेकदा वाहने लावण्‍यावरून नागरिकांमध्‍ये वादाचे प्रसंग घडतात. कधी कधी कर्मचार्‍यांनाही वाहने लावण्‍यास जागा उपलब्‍ध होत नाही. येथे वाहतूक नियंत्रण शाखेची क्रेनही तहसील कार्यालयात दिवसातून २ वेळा येते. यामुळे तहसील कार्यालयात शासकीय कामासाठी येणार्‍या महिला, विद्यार्थी आणि नागरिक यांचे वाहन उचलून नेल्‍यास त्‍यांना मोठ्या मनस्‍तापाला सामोरे जावे लागते. ‘नागरिकांची अडचण लक्षात न घेता वाहतूक नियंत्रण शाखा वाहने उचलून नेत आहेत’, असा आरोप नागरिक करत आहेत. सातारा तहसील कार्यालयाच्‍या इमारतीविषयीच्‍या समस्‍यांविषयी अनेक वेळा मंत्रालयात पत्रव्‍यवहार झाला आहे; पण कोणतीही कार्यवाही झाल्‍याचे निदर्शनास येत नाही. आतापर्यंतच्‍या प्रत्‍येक मंत्रीमंडळात सातारा जिल्‍ह्याला मंत्रीपद मिळालेले आहे; मात्र तहसील कार्यालयाची इमारत, तेथील वाहतूक कोंडी, सुसज्‍ज वाहनतळ हे प्रश्‍न अद्याप प्रलंबित आहेत.

पालटत्‍या काळानुसार सर्वच ठिकाणची प्रशासकीय कार्यालये किंवा अन्‍य कार्यालये, अधिकोष आदी ठिकाणी वाहनतळ उभारणे आवश्‍यक आहे. सर्व सुविधांनी युक्‍त प्रशासकीय कार्यालये, ही एक आदर्श व्‍यवस्‍था आहे. सर्वच ठिकाणच्‍या प्रशासकीय कार्यालयात मोठ्या संख्‍येने नागरिक येत असल्‍याने त्‍यांच्‍यासाठी पाणी, प्रसाधनगृह, वाहनतळ आदी सुविधांचा विचार प्रशासनाने केला पाहिजे.

– श्री. राहुल देवीदास कोल्‍हापुरे, सातारा