पूर्णत्यागी आणि साधनेद्वारे वासुदेवाचे दर्शन घेणारे योगी अरविंद यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणे !

आज महर्षि अरविंद यांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

योगी अरविंदांनी म्हटले आहे, ‘‘मी स्वातंत्र्याची काळजी करत नाही, जे इतरांना हवे असते, त्या गोष्टींचे मला आकर्षण नाही. मला शक्ती हवी, जेणेकरून मी हा देश उभा करू शकेन आणि माझ्या प्रिय देशवासियांची सेवा करू शकेन. राष्ट्र आणि मानवता यांसाठी मी अथक परिश्रम करू शकेन.’’

महर्षि योगी अरविंद

योगी अरविंद यांचे संपूर्ण जीवन आणि त्यांची योगसाधना भारताच्या स्वातंत्र्यासाठी अन् भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी होती. नर्मदा काठच्या अनेक योगीपुरुषांना ते भेटले आणि योगसाधनेतून भारताचा राजकीय अन् सांस्कृतिक उद्धार करण्यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे त्यांनी सहस्र क्रांती, लेखन, देशसेवकांची संघटना, प्राचार्यपदाचा त्याग, उच्च सैनिकी शिक्षणासाठी आपल्या मित्राला पाठवणे, शिक्षणसंस्थेच्या आडून शस्त्रास्त्र कारखाना काढणे, उदयपूरच्या एका सरदाराने काढलेल्या गुप्त संघटनेच्या महाराष्ट्र विभागात सहभागी होणे, खडतर कारावास, राष्ट्र्रीय स्वतंत्र कार्यात देशांतर, दुसर्‍या महायुद्धात आसुरी जर्मन शक्तीविरुद्ध सैनिकीकरणाला प्रोत्साहन, बुद्धीनिष्ठ, जहाल राष्ट्र्रभक्ती या सगळ्या वृत्ती-शक्तीचा अविष्कार केला.

खुदीराम बोस या क्रांतीकारकाने घडवलेल्या स्फोटाने सगळे क्रांतीकारक पकडले गेले. त्यांच्यात श्री अरविंद असल्यामुळे त्यांनाही अटक करून इतरांसमवेत अलीपूरच्या कारागृहात वर्षभर ठेवले होते. ६ फूट लांब आणि ४ फूट रूंद अशी ती कोठडी होती. जवळ केवळ जाडेभरडे खरखरीत खुटे होते. जाळीच्या दारातून पाऊस, वादळ, केरकचरा सतत कोठडीत येत असे. पाण्याचे एकच भांडे, कीटक-धूळ मिश्रित भात, गवत-पाने मिसळलेली भाजी, पांचट सार असे त्यांचे जेवण होते. उन्हाळ्यात ती कोठडी भट्टी बनत असे. तशा कोठडीत त्यांनी गीता-उपनिषदांचे सखोल अध्ययन केले आणि साधनेद्वारे ‘वासुदेव दर्शन’ घेतले.

‘१५ ऑगस्ट या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले, हे सत्य त्यांच्या योगसाधनेवरचे दैवी शिक्कामोर्तब आहे’, असे त्यांनी त्यांच्या संदेशात लिहिले.

(साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, ऑगस्ट २००७, पान क्र. २२)