कोकण रेल्‍वेच्‍या कोल्‍हापूर-वैभववाडी मार्गाला राष्‍ट्रीय नियोजन गटाचा हिरवा कंदील !

कोल्‍हापूर – कोकण रेल्‍वेला जोडणार्‍या कोल्‍हापूर-वैभववाडी मार्गाला ‘पी.एम्. गतीशक्‍ती’ अंतर्गत शिफारस करण्‍यात आली आहे. या मार्गासाठी ३ सहस्र ४११ कोटी रुपये व्‍यय अपेक्षित आहे. ही शिफारस ५३ व्‍या राष्‍ट्रीय नियोजन गटाच्‍या बैठकीत करण्‍यात आली आहे. उद्योग आणि व्‍यापार प्रोत्‍साहन विभागाच्‍या अंतर्गत ही बैठक पार पडली.

पश्‍चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर-वैभववाडी मार्गाची गेल्‍या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे; मात्र त्‍याला गती मिळत नव्‍हती. वर्ष २०१५ मध्‍ये याचे सर्वेक्षण झाल्‍यावर वर्ष २०१६ मध्‍ये तत्‍कालीन रेल्‍वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याची घोषणा केली होती. त्‍या वेळी सुमारे ३ सहस्र २०० कोटी रुपये हा व्‍यय अपेक्षित होता; मात्र त्‍यानंतर या संदर्भातील कोणतीही ठोस कृती घडली नाही. कोल्‍हापूर-वैभववाडी रेल्‍वे मार्ग पूर्ण झाल्‍यास पश्‍चिम महाराष्‍ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालवाहतूक करणेही यामुळे सुलभ होणार आहे.