जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने श्रीमद़्भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव !
पुणे – कोणतेही अध्यात्म विज्ञानाचा निषेध करत नाही. आत्मसुखासाठी अध्यात्म आहे, तर बाह्यसुखासाठी विज्ञान आहे. बाह्यवस्तूंचा जेवढा विचार आपण करतो, तेवढे आपण स्वतःपासून दूर जातो. अध्यात्म हे भारताचे वैभव आहे. विज्ञानाचा अभिमानही असलाच पाहिजे. अध्यात्म आणि भौतिक ज्ञान यांची सांगड घालता आली पाहिजे, असे प्रतिपादन भागवताचार्य श्रद्धेय स्वामी पंढरीनाथ महाराज शास्त्री (वृंदावन धाम) यांनी केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने ७ वा श्रीमद़्भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव नर्हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. त्या वेळी ते बोलत होते.
महोत्सवाच्या उद़्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अधिवक्ता शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. प्रासंगिक दृश्यांसह भव्यदिव्य संगीतमय कथा हे महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेखा जाधवर, अंजली येप्रे, लक्ष्मीछाया हुले आदींसह ह.भ.प. येप्रे महाराजांचा साधक वर्ग आणि समस्त नर्हेगाव ग्रामस्थ यांनी केले आहे.
स्वामी पंढरीनाथ महाराज शास्त्री पुढे म्हणाले की, भागवत कथा आपल्यातील धर्म टिकण्यासाठी आहे. मठ मंदिरे आपली ओळख टिकून रहाण्यासाठी. विश्वाच्या पाठीवर जेवढे लढे होतात ते आपापला धर्म टिकवण्यासाठी होतात. कुणी आपला धर्म तलवारीच्या जोरावर, तर कुणी प्रलोभने देऊन वाढवला. हिंदु धर्माने कधी प्रलोभने दाखवली नाहीत कि भीती दाखवली नाही. विचारा आणि योग्यता यांच्या जोरावर अजूनही हिंदु धर्म टिकून आहे. हिंदु धर्म कुणालाही त्रासदायक नाही. शुभसंस्काराने हा धर्म टिकला आहे.