अधिक सत्कर्मे करून घेणारा पुरुषोत्तम (अधिक) मास !

अहमेतैर्यथालोके प्रथितः पुरुषोत्तमः ।
तथाऽयमपि लोकेषु प्रथितः पुरुषोत्तमः ।।

अर्थ : ज्याप्रमाणे (माझे विविध गुण आणि पराक्रम यांमुळे) या लोकात मी ‘पुरुषोत्तम’ या नावाने विख्यात आहे, त्याप्रमाणे या पृथ्वीतलावर मलमास ‘पुरुषोत्तम मास’ नावाने प्रसिद्ध होईल.

परिपूर्ण हिंदु कालमापन पद्धत !

चंद्राला पृथ्वीभोवती १२ फेर्‍या पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा पृथ्वीला सूर्याभोवती १ फेरी पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या वेळेपेक्षा ५० मिनिटे न्यून असतो. हा काळ साचून ३ वर्षांत एका संपूर्ण मासाचा काळ सिद्ध होतो; म्हणून प्रत्येक ३ वर्षांनी ‘अधिक मास’ येतो. अधिक मासाच्या संकल्पनेमुळे हिंदु कालमापनपद्धत अधिक अचूक बनली आहे. अधिक मासाच्या योजनेमुळे हिंदूंचे सर्व सण, वार, उत्सव त्या त्या ऋतूंत येतात.

(संदर्भ : संकेतस्थळ)

अधिकमास म्हणजे काय ?

अ. चांद्रमास : सूर्य आणि चंद्र यांची एकदा युती होण्याच्या वेळेपासून, म्हणजे एका अमावास्येपासून पुन्हा अशी युती होईपर्यंत, म्हणजे पुढील मासाच्या अमावास्येपर्यंतचा काळ म्हणजे ‘चांद्रमास’ होय. सण, उत्सव, व्रते, उपासना, हवन, शांती, विवाह आदी हिंदु धर्मशास्त्रातील सर्व कृत्ये चांद्रमासाप्रमाणे (चंद्राच्या गतीवरून) ठरलेली आहेत. चांद्रमासांची नावे त्या मासात येणार्‍या पौर्णिमेच्या नक्षत्रांवरून पडली आहेत, उदा. चैत्र मासाच्या पौर्णिमेला चित्रा नक्षत्र असते.

आ. सौरमास : ऋतू सौरमासाप्रमाणे (सूर्याच्या गतीवरून) ठरलेले आहेत. सूर्य अश्विनी नक्षत्रापासून भ्रमण करत पुन्हा त्याच ठिकाणी येतो. तेवढ्या काळाला ‘सौरवर्ष’ असे म्हणतात.

इ. चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा, यासाठी अधिक मासाचे प्रयोजन ! : चांद्रवर्षाचे ३५४ दिवस आणि सौरवर्षाचे ३६५ दिवस असतात, म्हणजेच या दोन वर्षांमध्ये ११ दिवसांचे अंतर असते. हे अंतर भरून यावे’, तसेच चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा; म्हणून स्थूलमानाने सुमारे ३२।। (साडेबत्तीस) मासांनी एक अधिक मास धरतात, म्हणजे २७ ते ३५ मासांनी १ अधिक मास येतो.

अधिक मासाची अन्य नावे

अधिक मासाला ‘मलमास’ किंवा ‘धोंड्याचा महिना’ असे म्हणतात. अधिक मासात मंगलकार्याऐवजी विशेष व्रते आणि पुण्यकारक कृत्ये केली जातात; म्हणून याला ‘पुरुषोत्तम मास’, असेही म्हणतात.

‘अधिक मासाला पुढच्या मासाचे नाव देतात, उदा. श्रावण मासापूर्वी येणार्‍या अधिक मासाला ‘श्रावण अधिक मास’ असे संबोधतात आणि नंतर येणार्‍या मासाला ‘निज श्रावण मास’ म्हणतात. अधिक मास एखाद्या मोठ्या पर्वाप्रमाणे असतो. त्यामुळे या मासात धार्मिक कृत्ये करतात आणि ‘अधिक मास माहात्म्य’ ग्रंथाचे वाचन करतात.

अधिक मास कोणत्या मासात येतो ?

चैत्र ते आश्विन या सात मासांपैकी एक मास ‘अधिक मास’ म्हणून येतो. क्वचित् फाल्गुन मासही ‘अधिक मास’ म्हणून येतो. कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या मासांना जोडून अधिक मास येत नाही. या तीन मासांपैकी कोणता तरी एक मास क्षय मास होऊ शकतो; कारण या तीन मासांत सूर्याची गती अधिक असल्यामुळे एका चांद्रमासात त्याची दोन संक्रमणे होऊ शकतात. क्षय मास येतो, तेव्हा एका वर्षात क्षय मासाच्या पूर्वी १ आणि नंतर १, असे २ अधिक मास जवळजवळ येतात. माघ मास मात्र अधिक किंवा क्षय मास होत नाही.

– सौ. प्राजक्ता जोशी, सिंधुदुर्ग

अधिक मास काढण्याची पद्धत

अ. ज्या मासाच्या कृष्ण पंचमीस सूर्याची संक्रांत येईल, तोच मास प्रायः पुढील वर्षी अधिक मास होतो; परंतु हे स्थूलमान (सर्वसाधारण) आहे.

आ. शालिवाहन शकास १२ ने गुणावे आणि त्या गुणाकारास १९ ने भागावे. जी बाकी राहील, ती ९ किंवा त्यापेक्षा न्यून असेल, तर त्या वर्षी अधिक मास येईल, असे समजावे. उदा. या वर्षी शालिवाहन शक १९४५ आहे. १९४५ गुणिले १२ = २३३४०, २३३४० ला १९ ने भागल्यावर बाकी ८ उरते. बाकी ८ आल्याने या वर्षी अधिक मास आहे.

इ. आणखी एक पद्धत (अधिक विश्वसनीय) : विक्रम संवत् संख्येत २४ मिळवून त्या बेरजेला १६० ने भागावे.

१. बाकी ३०, ४९, ६८, ८७, १०६, १२५ यांच्यापैकी एखादी उरली तर चैत्र,
२. बाकी ११, ७६, ९५, ११४, १३३, १५२ यांच्यापैकी एखादी उरली तर वैशाख,
३. बाकी ०, ८, १९, २७, ३८, ४६, ५७, ६५, ८४, १०३, १२२, १४१, १४९ यांच्यापैकी एखादी उरली तर ज्येष्ठ,
४. बाकी १६, ३५, ५४, ७३, ९२, १११, १३०, १५७ यांच्यापैकी एखादी उरल्यास आषाढ,
५. बाकी ५, २३, ४६, ६२, ७०, ८१, ८२, ८९, १००, १०८, ११९, १२७, १३८, १४६ यांच्यापैकी एखादी उरल्यास श्रावण,
६. बाकी १३, ३२, ५१ यांच्यापैकी एखादी उरल्यास भाद्रपद आणि
७. बाकी २, २१, ४०, ५९, ७८, ९७, १३५, १४३, १४५ यांच्यापैकी एखादी उरल्यास आश्विन मास हा अधिकमास असतो. अन्य संख्या बाकी उरल्यास अधिक मास येत नाही.

उदा. या वर्षी विक्रम संवत् २०७९ आहे. २०७९ + २४ = २१०३. २१०३ ला १६० ने भागल्यावर बाकी २३ उरते. बाकी २३ आल्याने श्रावण मास हा अधिक मास आहे.

८. येणार्‍या अधिक मासांचे कोष्टक


– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद) (१.६.२०२३)