अवजड वाहनांसाठी वरंध घाटातील वाहतूक बंद करण्‍याचा निर्णय !

भोर – सुरक्षिततेच्‍या कारणासाठी भोरहून महाडकडे जाणारा वरंधघाट अवजड वाहनांसाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत बंद करण्‍याचा रायगड जिल्‍हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे; मात्र लहान गाड्या आणि दुचाकी वाहने यांना घाटातून प्रवेश करता येईल. त्‍यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्‍त केलेला घाट अद्यापही असुरक्षित असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. मागील वर्षी अतीवृष्‍टीमुळे घाटामध्‍ये अनेक ठिकाणी दरडी पडणे, माती वाहून येणे, रस्‍ता खचणे अशा घटना झाल्‍या होत्‍या. यंदा हवामान विभागाने रायगड जिल्‍ह्यात मुसळधार पर्जन्‍यवृष्‍टीचा अंदाज व्‍यक्‍त केला आहे. त्‍यामुळे सुरक्षिततेसाठी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल आणि पोलीस अधिकार्‍यांनी वरंध घाटामध्‍ये पहाणी करून घाट बंद करण्‍याचा निर्णय घेतला. वरंधघाट हा महाड-पंढरपूर राष्‍ट्रीय महामार्गाचा भाग आहे. या रस्‍त्‍यासाठी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ८२३ कोटी रुपये संमत केले आहेत; मात्र या कामाची निविदा प्रक्रिया अद्याप चालू झालेली नाही.

संपादकीय भूमिका

कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्‍त केलेला घाट अद्यापही असुरक्षितच असणे प्रशासनाला लज्‍जास्‍पद ! यासाठी घाट दुरुस्‍त करणारे ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्‍यावर कठोर कारवाई होणे आवश्‍यक !