धाराशिव येथे काम करून घेऊन कामगारांना डांबून ठेवणार्‍या ३ ठेकेदारांना पोलीस कोठडी !

प्रतीकात्मक छायाचित्र

धाराशिव – धाराशिव तालुक्‍यातील वाखरवाडी आणि कळंब तालुक्‍यातील खामसवाडी येथे विहिरीवर काम करण्‍यासाठी परजिल्‍ह्यातील ११ कामगारांना बळजोरीने डांबून ठेवणार्‍या कृष्‍णा शिंदे, संतोष जाधव आणि रणजित साबळे या ३ ठेकेदारांवर ढोकी पोलिसांनी गुन्‍हा नोंद करून अटक केली होती. तिघांनाही न्‍यायालयासमोर उपस्‍थित केले असता त्‍यांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. वाखरवाडी येथे ६ आणि खामसवाडी येथे ६ कामगारांना साखळदंडाने डांबून ठेवल्‍याच्‍या माहितीवरून जिल्‍हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्‍यासह ढोकी पोलिसांनी कामगारांची सुटका केली होती.

या संपूर्ण प्रकरणाचे अन्‍वेषण ढोकी येथील साहाय्‍यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत करत आहेत. सुटका केलेल्‍या ११ कामगारांतील काही जणांना त्‍यांचे कुटुंबीय घेऊन गेले आहेत, तर काही जणांचे कुटुंबीय नेण्‍यासाठी येणार आहेत. वाखरवाडी येथील कामगारांना विश्‍वासात घेत पोलिसांनी चौकशी केली. त्‍या वेळी कामगारांनी सांगितले की, संतोष जाधव आणि त्‍यांचे सहकारी दिवसा बळजोरीने विहिरीवर आमच्‍याकडून काम करून घेत आणि संध्‍याकाळी आम्‍ही पळून जाऊ नये; म्‍हणून आमचे हात-पाय साखळीने ट्रॅक्‍टरला बांधत होते.

संपादकीय भूमिका

समाजातील माणुसकी अल्‍प होत असल्‍याचे उदाहरण !