गोरखपूरमधील सुप्रसिद्ध ‘गीता प्रेस’ला म. गांधी शांतता पुरस्कार घोषित !

  • आतापर्यंत गीता प्रेसकडून श्रीमद् भगवद्गीतेच्या १६ कोटी २१ लाख प्रती प्रकाशित !

  • गीता प्रेसकडून १४ भाषांमध्ये एकूण ४१ कोटी ७० लाख पुस्तके प्रकाशित !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून येथील ‘गीता प्रेस’ला वर्ष २०२१ च्या महात्मा गांधी शांतता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा जगातील महत्त्वाचा पुरस्कार समजला जातो. म. गांधी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने वर्ष १९९५ पासून हा पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे. १ कोटी रुपये, सन्मानपत्र आणि उत्कृष्ट पारंपरिक हस्तकलेचे स्मृतीचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याअगोदर इस्रो, रामकृष्ण मिशन, ग्रामीण बँक ऑफ बांगलादेश, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी; अक्षय पत्र, बेंगळुरू; एकल अभियान ट्रस्ट भारत आणि सुलभ इंटरनॅशनल, नवी देहली या संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय गीता प्रेसला पुरस्कार घोषित करतांना म्हटले की, गीता प्रेसच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताया प्रेसला गांधी शांतता पुरस्कार प्रदान करणे, ही प्रेसच्या माध्यमातून त्यांच्या मालकांनी समाजसेवेत केलेल्या कार्याची पावती आहे. गीता प्रेसचे अतुलनीय योगदान मानवतेच्या सामूहिक उत्थानासाठी महत्त्वपूर्ण असून ते खर्‍या अर्थाने गांधीवादी जीवनाचे प्रतीक आहे.

गीता प्रेसचे धर्मग्रंथांविषयीचे अभूतपूर्व योगदान !

गीता प्रेसची स्थापना वर्ष १९२३ मध्ये करण्यात आली. गीता प्रेस ही जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. गीता प्रेसने आतापर्यंत श्रीमद् भगवद्गीतेच्या १६ कोटी २१ लाख प्रती प्रकाशित केल्या आहेत. गीता प्रेसने १४ भाषांमध्ये ४१ कोटी ७० लाख  पुस्तके प्रकाशित केली आहेत. महसूल (पैसे) मिळवण्यासाठी संस्था कधीही  विज्ञापनांवर अवलंबून राहिलेली नाही. गीता प्रेस त्याच्या संलग्न संस्थांसह जीवनाच्या उन्नतीसाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करत आहे. भारतभरातील हिंदूंपर्यंत वेद, पुराण आणि उपनिषदे यांचे ज्ञान पोचवण्यामध्ये गीता प्रेसचे योगदान अभूतपूर्व आहे.

पंतप्रधानांकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता प्रेसला पुरस्कार मिळाल्यावरून कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने गीता प्रेसने १०० वर्षे कौतुकास्पद कार्य केले आहे. मी गोरखपूरच्या गीता प्रेसला म. गांधी शांतता पुरस्कार मिळाल्यासाठी अभिनंदन करतो.

(म्हणे) ‘सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखा निर्णय ! – काँग्रेसची टीका

गीता प्रेसला घोषित झालेल्या पुरस्कारावरून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, अक्षय मुकुल यांनी वर्ष २०१५ मध्ये या प्रेसविषयी एक जीवनचरित्र लिहिले आहे. यात त्यांनी या प्रेसचे आणि म. गांधी यांच्यातील चढ-उताराचे संबंध, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक धोरणांवरून चाललेल्या लढाईची माहिती दिली आहे. केंद्र सरकारचा पुरस्काराचा निर्णय, हा एक उपहास असून हा सावरकर अन् गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखा प्रकार आहे. (अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथ प्रकाशित करणार्‍या संस्थेला म. गांधी पुरस्कार देण्यात आला असता, तर काँग्रेसने दिवाळीच साजरी केली असती; मात्र हिंदूंच्या धर्मग्रंथांचा प्रसार करणार्‍या मुद्रणालयाला पुरस्कार मिळाल्यानेच त्याचा विरोध केला जात आहे, हे जाणा ! – संपादक)