मुंबईत हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा खेळ बंद पाडला !

मुंबई – नालासोपारा येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १८ जूनच्या सायंकाळी एका चित्रपटगृहातील ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा खेळ बंद पाडला. हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहामध्ये घोषणा देत प्रेक्षकांना बाहेर काढले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांचा कर्मचार्‍याशी वाद झाला. त्यानंतर या चित्रपटाचा खेळ रहित करण्यात आला.

आमच्या देवाचा अवमान आम्ही सहन करू शकत नाही !

‘चित्रपटात ‘रामायण’ चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले असून त्यामुळे या पौराणिक कथेची प्रतिष्ठा घटत आहे. आमच्या देवाचा अवमान झालेला आम्ही सहन करू शकत नाही. तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवणार का ? आमच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना आम्ही विरोध करणार. आम्हाला फासावर चढावे लागले, तरी चालेल; पण अवमान सहन करणार नाही’, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.