कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील ५३६ उद्योजकांना नोटीस !

प्रतिकात्मक चित्र

सातारा – राज्यातील अनेक उद्योजकांनीमधील भूखंड स्वत:च्या कह्यात ठेवले आहेत. हे भूखंड विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विशेष मुदतवाढ योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज करण्याचा कालावधीत ३० जूनला संपत आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एक नोटीस कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील ५३६ उद्योजकांना पाठवली आहे. त्यामुळे सध्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाठवलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, जे उद्योजक भूखंड विकसित करणार नाहीत, त्यांच्याकडून भूखंड काढून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित उद्योजकांनी ३० जूनपर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा. भूखंडाचा विकास करून उत्पादन चालू करण्यासाठी काही उद्योजकांनी मुदतवाढ संमत करून घेतली आहे; मात्र भूखंडाचा विकास केला नसल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांना विविध आव्हानांचा सामना करावा लागला. हे पहाता राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शेवटची संधी म्हणून भूखंड विकसित करण्यासाठी विशेष मुदतवाढ योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे.

कोणत्या औद्योगिक वसाहतींना किती नोटिसा पाठवल्या ?

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली १९, गोकुळ शिरगाव ३२, कागल-हातकणंगले पंचतारांकित २०६, हलकर्णी ७६, आजरा ४, गडहिंग्लज १६, तसेच सातारा जिल्ह्यातील सातारा २९, अतिरिक्त सातारा २१, कराड २८, वाई ३०, पाटण ८, लोणंद १२, फलटण ४९, कोरेगाव ५, खंडाळा (सेझ) १ या औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.