परदेशी नागरिकांची माहिती तात्काळ कळवा ! – समीर शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा

समीर शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा

सातारा – जिल्ह्यात अनेक परदेशी नागरिक हे प्रतिवर्षी विविध कारणास्तव भेट देतात. यामध्ये पर्यटन, नोकरी, शिक्षण, वैद्यकीय उपचार आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, कराड, फलटण, शिरवळ, खंडाळा, म्हसवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशी नागरीक येत असतात. या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून परदेशी नागरिक जिल्ह्यात आल्यानंतर त्यांची माहिती तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.

समीर शेख पुढे म्हणाले की, परदेशी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करणार्‍या हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, रेस्ट हाऊस, गेस्ट हाऊस, धर्मशाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, वैयक्तिक घरे आदींचे मालक किंवा चालक यांनी परदेशी नागरिकांचे ऑनलाईन ‘सी फॉर्म’ २४ घंट्यांत भरणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यावर त्याची एक प्रत आणि संबंधित परदेशी नागरिकाचे पारपत्र अन् व्हिसा यांची प्रत संबंधित पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक असते. आपल्याकडे वास्तव्यास आलेल्या परदेशी पाहुण्यांना पारपत्र आणि व्हिसा विचारून मगच त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था संबंधितांनी करावी. अनेक वेळा परदेशी नागरिकांकडून त्यांना दिलेल्या व्हिसाचे उल्लंघन केले जाते. मुदत संपल्यानंतरही काहीजण अधिक दिवस भारतात राहून अमली पदार्थांची विक्री करणे, सायबर गुन्हे, देशविघातक कारवाया करणे, तसेच इतर अवैध उद्योग करतात. देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे धोकादायक आहे. या अवैध कारवायांना पायबंद घालणे आवश्यक आहे. त्यामुळे परदेशी पाहुण्यांची माहिती देण्यास कुणीही निष्काळजीपणा करू नये, अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.