सातारा जिल्ह्यातील २०० हून अधिक शासकीय वाहने भंगारात !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

सातारा, ३ जून (वार्ता.) – शासकीय कार्यालयातील मुदत संपलेली वाहने १ मेपासून भंगारात काढण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील २०० हून अधिक शासकीय वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत. सध्या २० वाहने भंगारात काढण्याची प्रक्रिया चालू झाली असून जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांतील वाहनांचा यात समावेश आहे.

काही विभागांना अद्याप नवीन वाहने मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांची कामे खोळंबली आहेत. पावसाळा तोंडावर आला असतांना कामे हातावेगळी करतांना विविध शासकीय विभागांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र ग्रामीण आणि दुर्गम भागांत असल्यामुळे अधिकार्‍यांना कामे करतांना अडचणी येत आहेत. त्यामुळे नवीन वाहने तातडीने उपलब्ध व्हावीत, अशी मागणी अधिकारी वर्गाकडून केली जात आहे. वाहनांची बोलीद्वारे विक्री झाली नाही, तर ही वाहने भंगारात काढली जाणार आहेत. भंगारात जाणारी सर्वाधिक १२ वाहने सातारा जिल्हा परिषदेची आहेत. पोलीसदलालाही जोपर्यंत नवीन वाहने मिळत नाहीत, तोपर्यंत अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

रस्त्यावर चालवण्यास अयोग्य असणार्‍या वाहनांना शासन मान्यतेनुसार निर्लेखित करण्यात येते. यानुसार अशी वाहने पहिल्या टप्प्यात निर्लेखित केली जात आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.