हिंदुत्‍वाच्‍या रक्षणासाठी तुम्‍हा सर्वांना दायित्‍व घ्‍यावे लागेल ! – मंगलप्रभात लोढा

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या १४० व्‍या जयंतीनिमित्ताने रत्नागिरीत कार्यक्रम

स्‍वातंत्र्यवीर सावरकर

रत्नागिरी, २८ मे (वार्ता.)- १०० वर्षांपूर्वी समाजातील दलित बंधूंना मान कसा मिळावा ? याकरता भागोजीशेठ कीर यांनी पतित पावन मंदिर उभारले. याच मंदिरात वीर सावरकर यांनी सहभोजन चालू केले. वीर सावरकर यांनी ‘स्‍वातंत्र्य मिळण्‍यापूर्वी भारतमातेला परकीय शक्‍तींपासून मुक्‍त करीन’, अशी शपथ घेतली; कारण त्‍याविना भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणार नाही, हे त्‍यांना ठाऊक होते. त्‍यांनी भारताला हिंदु राष्‍ट्र करण्‍यासाठी हिंदुत्‍व ग्रंथ लिहिला. त्‍याची यंदा शताब्‍दी चालू आहे. भारतीय संस्‍कृतीचे रक्षण आणि हिंदुत्‍वाच्‍या रक्षणासाठी तुम्‍हा सर्वांना दायित्‍व घ्‍यावे लागेल, असे आवाहन राज्‍याचे महाराष्‍ट्र राज्‍याचे पर्यटन, कौशल्‍य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्‍यता, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

रत्नागिरीमध्‍ये ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्‍ताहा’ची २८ मे या दिवशी शोभायात्रा आणि सहभोजनाने सांगता झाली. त्‍या वेळी झालेल्‍या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.

मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्‍हणाले की,

१. महाविकास आघाडीने तुष्‍टीकरणाचे राजकारण केले; परंतु मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्‍वासाठी एकत्र येत, स्‍वा. सावरकरांची प्रेरणा घेत  युतीचे सरकार स्‍थापन केले. हिंदुत्‍व मानणार्‍यांना एकत्र यावे लागेल.

२. २० मंत्र्यांनी सरकार सोडले आणि युती केली. यामागे स्‍वा. सावरकरांची प्रेरणा होती, हिंदुत्‍वाची कल्‍पना होती.

३. आज मोठ्या संख्‍येने सावरकरप्रेमी आले आहेत. त्‍यांच्‍या मनात त्‍याग, तपस्‍या, अर्पणभाव आहे. सर्वांनी भारतीय संस्‍कृतीचे रक्षण करावे आणि पुन्‍हा अखंड भारत करावा.

.. त्‍यांचा ‘करेक्‍ट’ कार्यक्रम करणार ! – मंत्री उदय सामंत

‘ भारत जोडो’ यात्रेत स्‍वा. सावरकरांवर खालच्‍या स्‍तरावरून टीका केली गेली. ज्‍यांना स्‍वातंत्र्यवीर कळले नाहीत, त्‍यांचा इतिहास कधी वाचला नाही, त्‍यांनी सावरकरांचे नावसुद्धा घेणे निषेधार्ह आहे. रत्नागिरीतही सामाजिक माध्‍यमातून चांगल्‍या कामाची अपकीर्ती करत चुकीचे संदेश ‘व्‍हायरल’ करणार्‍या शक्‍तींचा ‘करेक्‍ट’ कार्यक्रम केला जाईल. शिंदे- फडणवीस सरकाराने इतिहासात प्रथमच २८ मे सावरकरांची जयंती हा ‘सावरकर गौरव दिन’ म्‍हणून साजरा होत आहे. पुढच्‍या पिढीला सावरकरांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो त्‍याला ‘करेक्‍ट’ करण्‍याचे काम केले पाहिजे. मी ‘करेक्‍ट’ हा शब्‍द वापरला; कारण देशात सावरकरांच्‍या अपकीर्तीची मोहीम आखली जात आहे.

सावरकरांमुळे स्‍वातंत्र्याचा विषय आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर ! – पद्मश्री दादा इदाते

सावरकर दर्शन प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष, पद्मश्री दादा इदाते म्‍हणाले की, वर्ष १९२३ ला सावरकरांनी हिंदुत्‍व ग्रंथ लिहिला. ‘देशाला पितृ आणि पुण्‍यभूमी म्‍हणतो, तो हिंदु’ अशी व्‍याख्‍या त्‍यांनी केली. वर्ष १९२४ डॉ. आंबेडकरांनी बहिष्‍कृत हितकारिणी सभा स्‍थापन केली आणि ‘शिका अन् संघर्ष करा’, असा संदेश दिला. देशाच्‍या संरक्षणासाठी सावरकरांनी योगदान दिले. त्‍यांनी परदेशांतून पिस्‍तुले पाठवली. त्‍यातील एक पिस्‍तूल हुतात्‍मा कान्‍हेरे यांना मिळाले. त्‍यांनी जॅक्‍सनचा वध केला. त्‍याचा शोध घेतांना सावरकांनी हे पिस्‍तूल पाठवल्‍याचे लक्षात आले. हेग न्‍यायालयात हा विषय आला. त्‍यामुळे भारतीय स्‍वातंत्र्याचा विषय आंतरराष्‍ट्रीय गेला. त्‍याचे कारण सावरकर होते. सावरकरांनी जात्‍युच्‍छेदक निबंध ग्रंथ लिहिला आणि त्‍यात एकात्‍म हिंदुत्‍वाची हाक दिली. आज आपण त्‍याच दिशेने जातो आहोत.