अनादी, अनंत, अवध्य विनायक सावरकर !

सावरकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने २१ ते २८ मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने…

‘क्रांतीसूर्य, स्वातंत्र्यवीर हिंदुहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर, म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील तेजस्वी योद्धा, निर्भिड सशस्त्र क्रांतीकारक, प्रखर वक्ता, मनस्वी महाकवी, संपूर्ण देशासाठी प्रेरक इतिहास लेखक, प्रगल्भ कादंबरीकार, अमर गीतलेखक, ध्येयवादी नाटककार, भाषाप्रभु, मराठी नवशब्दांचा निर्माता, द्रष्टा विचारवंत, स्वयंभू नेता, हिंदुत्वविचार मार्गदर्शक, हिंदु राष्ट्राचा उद्गाता, पुरोगामी हिंदु विचारवंत, बंडखोर समाजसुधारक, ४० हून अधिक मराठी आणि इंग्रजी ग्रंथांचा लेखक, व्यासंगी अभ्यासक, अर्थशास्त्र, राजकारण आणि परराष्ट्र धोरण यांचा उद्गाता, हिंदु-मुसलमान द्विराष्ट्रवादाचा समर्थक, अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रणेता, जातीयवाद आणि अंधश्रद्धा यांचा निवारक , तर्कनिष्ठ राष्ट्रीय हिंदुत्व विचारांचा दार्शनिक, क्रांतीकारकांचा गुरु आणि मार्गदर्शक, स्वदेशी चळवळीचा सक्रीय नेता, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष, अभिनव भारत संघाचा संघटक, व्यासंगी ललित लेखक, निर्भिड संपादक, कुटुंबवत्सल पिता, पती, बंधू आणि दीर; निरपेक्ष राजकारणी, संन्यस्त उत्तर आयुष्य जगून प्रायोपवेशन करून मृत्यूला सामोरा जाणारा ऋषितुल्य महामानव, म्हणजे वि.दा. सावरकर ! प्रज्वलित अग्निहोत्र जणू ! आधुनिक दधिची ऋषि !

श्री. विवेक प्रभाकर सिन्नरकर

१. ‘विनायक’ हे नाव सार्थ ठरवणारे सावरकर !

‘विनायक’ हे नाव भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. आपले लाडके दैवत श्री गणेशाचे हे नाव आहे. गणेशपूजन आणि श्री गणेशस्तवन करूनच कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ होतो. त्याप्रमाणे आपले आराध्य दैवत अशा भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्याचे स्तवन ‘विनायक सावरकर’ यांचे स्मरण केल्याखेरीज होऊच शकत नाही. एवढे त्यांचे उत्तुंग राष्ट्रकार्य आहे. ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम् !’, असे तन, मन आणि धन अर्पण करून राष्ट्रकार्य करणारे स्वातंत्र्यसैनिक म्हणत असतात. ते स्वातंत्र्याचे आणि हिंदुत्वाचे प्रखर मंत्र-तंत्र आपल्याला देणारा प्रतापी ऋषि, म्हणजे विनायक दामोदर सावरकर !

२. ‘स्वातंत्र्य’ या विचाराचे वाहक !

‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी वेदोक्त गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांच्या मुशीतून घडलेले सावरकर हे स्वातंत्र्य विचाराचे वाहक बनले. विनायक याचा एक अर्थ ‘वाहून नेणारा’, असाही आहे. तो या विनायकाने सार्थ ठरवला.

३. क्रांतीकारकांचे आदर्श मार्गदर्शक

विनायक याचा अर्थ ‘मार्गदर्शक’ असाही आहे. वयाच्या ११ व्या वर्षी सावरकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मरेपर्यंत झुंजत रहाण्याची सवंगड्यांसह प्रतिज्ञा घेतली होती आणि ती आजन्म पाळली. मदनलाल धिंग्रा आणि अनंत कान्हेरे यांसारखे स्वातंत्र्यासाठी जीव ओवाळून टाकणारे अनेक क्रांतीकारी त्यांनी घडवले. त्यांच्या धगधगत्या लेखनाने लक्षावधी भारतीय युवकांची मने आणि मनगटे प्रस्फुरीत झाली.

४. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ लिहून क्रांतीकारकांचा गौरव करणारे सावरकर ! 

विनायक नावाचा एक अर्थ ‘वाटाड्या’, असाही आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा ‘वेद’ म्हणता येईल, असा  सावरकरांचा ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ हा ग्रंथ ब्रिटन आणि भारत येथील क्रांतीकारकांसाठी स्वातंत्र्यलढ्याचा वाटाड्या बनला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तोच ग्रंथ देशाला संघटित आणि जागरूक ठेवण्यासाठी राष्ट्रवादाचा ‘महामार्ग’ सिद्ध झाला. त्यातून विविधतेतील राष्ट्रीय एकत्व जगासमोर आले. मुळात युवा विनायक सावरकरांनी हा ग्रंथ ब्रिटनमध्ये कायद्याचे शिक्षण घेता घेता लिहिला आणि इंग्रजीत भाषांतर करुन प्रसारित केला. त्याच्या पारायणाने अगणित क्रांतीकारक घडले. ब्रिटिशांनी ‘१८५७’ च्या लढ्याला ‘शिपायांचे कथित बंड’ असा शिक्का मारून न्यून लेखले होते. त्या हिंदुस्थानी क्रांतीकारकांचा लढा आणि बलीदान यांना ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ नावाचा ग्रंथ लिहून याच विनायकाने गौरवले. आज तो ग्रंथ आमचा गौरवाचा इतिहास म्हणून सर्वांना प्रेरणा देत आहे आणि पुढेही देत राहील.

५. ‘इदं शस्त्रम् इदं शास्त्रम्’, अशा बाणेदार वृत्तीचे सावरकर !

ब्रिटनमध्ये संशयित सशस्त्र क्रांतीकारक म्हणून पकडले गेल्यानंतर सावरकरांना  कठोर तपासणीला सामोरे जावे लागले. तेव्हा त्यांच्याकडे काही शस्त्र मिळाले नाही. त्यामुळे एका ब्रिटीश सैनिकाने त्यांना खिजवले. तेव्हा स्वत:च्या खिशातील पेन दाखवून सावरकर त्या सैनिकाला बेडरपणे म्हणाले, ‘‘तुम्ही जे शस्त्र शोधताय, ते ही लेखणी आहे. ती तुम्ही कह्यात नाही घेतली. माझे खरे शस्त्र, तर ही लेखणी आहे. हे लेखणीचे शस्त्र तुम्ही हिसकावून घेऊ शकत नाही. या लेखणीने मी लढेन.’’ खरोखरच त्यांची लेखणी ही ब्रिटिशांच्या बंदुका, तोफा, बाँबगोळे आणि छळछावण्या यांहून प्रभावी शस्त्र ठरली. याला इतिहास साक्ष आहे. ‘इदं शस्त्रम् इदम् शास्त्रम्’, अशी त्यांची बाणेदार वृत्ती होती. सावरकरांनी त्या लेखणीने ब्रिटीश साम्राज्याच्या पायाखाली स्वराज्याचा सुरूंग पेरून त्यांचे साम्राज्य खिळखिळे केले होते. त्यांनी लेखणीच्या माध्यमातून स्वराज्याची ज्योत भारतीय मनामनात पेटवली होती.

६. स्वयंभू देशभक्त !

विनायक नावाचा आणखी एक अर्थ आहे, ‘स्वयंभू’! सावरकर हे ‘अनादी मी, अनंत मी, अवध्य मी भला ! मारील रिपु जगति, असा कवण जन्मला’, असे बेदरकार गीत लिहितात. त्यातच त्यांचा सगुण-निर्गुण अशा रूपातील चिरंतन तात्त्विक आत्मविश्वास दिसतो. हाच विनायक एकमेव स्वयंभू देशभक्त ! हा देशासाठी जन्मोजन्मी ‘तुजसाठी मरण ते जनन, तुज विण जनन ते मरण’, असे गाणारा केवळ ‘स्वयंभू’ विनायक सावरकरच असू शकतो. अंदमानमध्ये २ जन्मठेप स्वीकारतांना सावरकर यांनी, ‘५० वर्षे मी कारागृहामध्ये जिवंत रहाणार का ? , या दाहक कुचेष्टेहून पुढील ५० वर्षे तुमची ब्रिटीश सत्ता भारतासह तिसर्‍या जगावर अबाधित टिकून रहाणार का ? याची तुम्ही काळजी करा’, असे आव्हानच ब्रिटीश अधिकार्‍यांना दिले होते आणि ते खरे ठरले.

७. ‘गरूडदृष्टी’ असणारे द्रष्टे युगपुरुष !

विनायक नावाचा एक अर्थ ‘गरूड’ किंवा ‘वैनतेय’, असाही आहे. गरूड हे महाविष्णूचे वाहन आहे. विष्णु हे विश्वाचे पालक आहेत. त्यांच्या या कार्यात गरुडाचा मोठा सहभाग आहे. गरूड हे दूरदृष्टी, शक्ती आणि बुद्धी यांचे प्रतीक आहे. श्रीविष्णु यांनी गरुडाला वाहन म्हणून स्वीकारले. यातच त्याची महत्ता समजू शकते. विनायक सावरकर हे ‘गरूडझेप’ घेणारे नेते होते. स्वातंत्र्यलढा, यातना सहन करणे, लिखाण करणे, प्रबळ हिंदु राष्ट्राची रूपरेषा आखणे, मार्सेलीस जहाजावरून समुद्रात झेपावणे, पतितपावन मंदिर उभारणे अशा सर्व प्रसंगी  त्यांची प्रतिभा गरुडाप्रमाणे सर्वांत उच्च स्थानी विहंग करत असल्याचे दिसते.

अंदमानामध्ये मरणप्राय यातना सोसतांना त्यांना वेदना होत नव्हत्या, तर ते स्वतंत्र आणि बलशाली भारताचे स्वप्न पहात होते. त्याकाळी त्यांनी अंदमान हे स्वतंत्र भारताचे उत्कृष्ट नाविक केंद्र होऊ शकते, असे भविष्यातील स्वप्न पाहिले होते. हीच ती ‘गरूड दृष्टी !’ हाच तो द्रष्टा युगपुरुष विनायक. गरूड जसे सर्पांचा कर्दनकाळ असतो, तसे विनायक सावरकर हे राष्ट्रद्रोही, हिंदुद्रोही आणि स्वातंत्र्यद्रोही यांचे कर्दनकाळ होते.

८. हिंदूंनो, विनायक सावरकर यांचा अभिमान बाळगा !

लेखणी, वाणी आणि कृती यांच्या द्वारे त्यांनी सावध करून हितशत्रूंपासून देशाचे रक्षण केले, एक अत्युच्च आदर्श घालून दिला, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व यांचे बाळकडू आपल्या पिढ्यांना पाजले, हिंदु असण्याची अस्मिता दिली आणि दानशूर होऊन वैज्ञानिक प्रगत हिंदु विचारांची कवचकुंडले हिंदुस्थानरूपी सूर्यदेवाला देऊन मृत्यूला जिंकले. आयुष्यभर देव, देश आणि धर्म यांसाठी देह झिजवला. ‘समाजसेवा हिच मुक्ती आणि देशसेवा हाच मोक्ष’, असे ज्वलंत विचार जनसामान्यांच्या तनमनात रुजवले. त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालून आपणही अभिमानाने म्हणूया,… हो , मी आहे विनायक सावरकर ! अनादी मी…अनंत मी …..अवध्य मी ..मी विनायक सावरकर…!’

– श्री. विवेक प्रभाकर सिन्नरकर, कोथरुड, पुणे.