दोघांचा जागीच मृत्यू
पुणे – कोंढव्यातील एन्.आय.बी.एम्. रस्त्यावर इशरत बाग परिसरात २१ मे या दिवशी भरधाव खासगी बसचे ब्रेक निकामी होऊन बसने ५ ते ६ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या विचित्र अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे, तर ४ जण गंभीर घायाळ झाले आहेत. तीव्र उतारावरच बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बसने लोकांना अक्षरश: चिरडले. अपघाताच्या ठिकाणी जवळच असलेल्या सी.सी.टी.व्ही.मध्ये हा सर्व प्रकार चित्रीत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घायाळांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी बसचालक आरोपी मैनुद्दीन शेख याला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.