हिंदु एकजुटीचे भावपूर्ण सादरीकरण
नेवासा (जिल्हा नगर) – येथे विश्व हिंदु परिषद, दुर्गा वाहिनी बजरंग दलाच्या वतीने पथ संचलन करत १९ मे या दिवशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये दुर्गा वाहिनीच्या ३५० ‘दुर्गा’ सहभागी झाल्या होत्या. श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते ‘भारत माते’च्या प्रतिमेचे पूजन करून शोभयात्रेस प्रारंभ झाला. मळगंगा देवी मंदिरापासून या शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला.
यामध्ये दुर्गा वाहिनीच्या युवतींनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता, तसेच विठ्ठल-रखुमाई, प्रभु श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमंत अशी देवतांची प्रतिकात्मक वेशभूषा केलेली दिसून आली. यात्रेच्या प्रारंभी झांजपथक, मध्यभागी सैनिकी गाडीमध्ये पुष्पांनी सजवलेली ‘भारतमाते’ची प्रतिमा ठेवण्यात आली होती. या वेळी ‘आर्य सनातन वैदिक हिंदु धर्म की जय’, ‘जय श्रीराम’, ‘वन्दे मातरम्’ या क्षात्रतेजाचे स्मरण करून देणार्या घोषणांनी मार्गांवरील वातावरण हिंदुमय झाले होते.