पंढरपूर आषाढी वारीची सिद्धता
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या (आषाढी वारी) अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली, तसेच पुरंदर तालुक्यातून जाणार्या पुणे-सासवड-जेजुरी-नीरा या पालखी मार्गाला आणि पालखी तळ, विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील सिद्धतेच्या अनुषंगाने आढावा घेतला. या वेळी अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते.
वारकर्यांना कोणत्याही असुविधांना तोंड द्यायला लागू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालखी मार्गांवर आरोग्य सुविधा, औषध साठा, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, पाणी, वीज आदींच्या सुविधांना प्राधान्य द्यावे. पालखी मार्गाच्या रस्त्याच्या कडेचे खड्डे, तसेच पाणी साचणार्या ठिकाणी मुरूम आणि अन्य पर्याय यांचा विचार करून डागडुजी करावी. पालखी विसावा किंवा मुक्काम असलेल्या गावातील पिण्याच्या पाणी योजनांसाठी अतिरिक्त राखीव पंप ठेवावेत. पाण्याचे टँकर वाढवावेत. ऐनवेळी तांत्रिक अडचणी येऊ नयेत; म्हणून पर्यायी व्यवस्था सिद्ध ठेवावी, अशा स्वरूपाच्या सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.