आधार जोडणी अन् केवायसी यांच्या अभावी महाराष्ट्रातील ३१ लाख ८३ सहस्र शेतकर्यांना ‘पी.एम्. किसान’ हप्ता नाही !

नागपूर – आधार जोडणी आणि केवायसी (रहिवाशांचे प्रमाणीकरण वापरणार्या संस्था, उदा. बँका, आधार या रहिवाशाला त्याच्या पत्त्याचा पुरावा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्याची संमती देण्याची प्रक्रिया) नसल्यामुळे महाराष्ट्रातील ३१ लाख ८३ सहस्र ६४० शेतकर्यांवर पी.एम्. किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे. यामध्ये १८ लाख ९६ सहस्र ९५३ शेतकर्यांनी अजूनही केवायसी पूर्ण केलेली नसून १२ लाख ८६ सहस्र ६८७ शेतकर्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त तथा पी.एम्. किसान योजनेचे राज्यस्तरीय कार्यवाही प्रमुख सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

सुनील चव्हाण पुढे म्हणाले की,

१. पी.एम्. किसानसाठी राज्यात १ कोटी १६ लाख ८८ सहस्र ८७१ शेतकर्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ९८ लाख ५ सहस्र २७५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

२. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला २ सहस्र रुपये प्रतिहप्ता या प्रमाणे ६ सहस्र रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ मेच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे. त्यासाठी लाभार्थींनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे बंधनकारक आहे; पण १२.९१ लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकाला जोडलेली नाहीत. त्यामुळे लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

३. लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्तर यांच्या वतीने उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड आणि भ्रमणभाष क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील टपाल विभागाचे कर्मचारी यांच्या वतीने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. बँक खाते आधार क्रमांकाशी ४८ घंट्यांत जोडले जाईल.

४. योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य असल्याने आयपीपीबीवतीने १ ते १५ मे २०२३ या कालावधीत यासाठी गाव पातळीवर मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे.