पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन

नांदेड – जागतिक हवामानातील पालट आणि त्यांचे होणारे दुष्परिणाम आपण सारेच अनुभवत आहोत. सद्यस्थितीत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा आपल्याला जरी समाधानकारक वाटत असला, तरी या पाण्याचे अधिक काळजीपूर्वक काटेकोर नियोजन केल्याविना पर्याय नाही. हवामानतज्ञांनी अल्निनो आणि इतर घटक यांमुळे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत उष्णता अधिक आणि पावसाचे प्रमाण अल्प अशी स्थिती दर्शवली आहे. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता विविध प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल, अशी सूचना राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे २ मे या दिवशी आयोजित केलेल्या कालवा सल्लागार समिती, खरीप हंगाम पूर्व सिद्धता आढावा आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्ष आढावा बैठकीत ते बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले की, खरीप हंगामाचे नियोजन करतांना प्रशासकीय पातळीवर शासन योग्य ती दक्षता घेत आहे. तथापि शेतकर्‍यांनीही पुरेसा पाऊस जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत पेरणीच्या मोहापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. कृषी तज्ञ आणि कृषी विभाग वेळोवेळी ज्या काही सूचना देतील, त्यांचे पालन करून खरीप हंगामाचे नियोजन शेतकर्‍यांनी करावे.