अवघ्या ४ वर्षांत संत चोखामेळा यांचे मंदिर कोसळल्याचे प्रकरण
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील प्रसिद्ध तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा यांचे संगमरवरी मंदिर कोसळल्याच्या घटनेविषयी तुळशी वृंदावनाच्या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट (संरचनात्मक परीक्षण) करावे, असे लेखी आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनानंतर भाविकांना संत चरित्रे पहाता यावीत, तसेच श्री विठ्ठलाला प्रिय असलेल्या तुळशी पहाता याव्यात, यासाठी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून येथील यमाई तलावाच्या शेजारी कोट्यवधी रुपये व्यय करून तुळशी वृंदावन सिद्ध करण्यात आले आहे. केवळ ४ वर्षांतच वृंदावनातील संत चोखामेळा यांचे संगमरवरी मंदिर कोसळले आहे. या प्रकारामुळे वृंदावनाच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.