सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ६ वर्षे) यांच्‍या नावातील चैतन्‍याची आलेली प्रचीती !

वैशाख शुक्‍ल दशमी (३०.४.२०२३) या दिवशी सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा सहावा वाढदिवस आहे. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘पू. भार्गवराम’ असे त्‍यांचे नामकरण केले. त्‍यांनी ठेवलेल्‍या नावातील चैतन्‍याविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. भार्गवराम भरत प्रभु यांच्‍या चरणी  सहाव्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

१. ‘भार्गवराम’ हे नाव उच्‍चारायला मोठे असूनही कोणी त्‍यांना ‘भार्गव’ किंवा ‘राम’ असे संंबोधित नाहीत. आम्‍ही घरातील सर्व जण, आमचे शेजारी, तसेच पू. भार्गवराम यांच्‍या शाळेतील शिक्षक त्‍यांना पूर्ण नावानेच संबोधतात.

२. ‘पू. भार्गवराम’ असे म्‍हटल्‍यावर मला पुष्‍कळ अंतर्मुखता जाणवते. मला वाटते, ‘भार्गवराम’ या नावामुळे माझा त्‍या जिवाप्रती आदर आणि भाव वाढला आहे.

सौ. भवानी भरत प्रभु

३. समाजातील व्‍यक्‍तींना ‘पू. भार्गवराम’ या नावातील चैतन्‍याची आलेली प्रचीती !

३ अ. पुरोहितांना ‘कुलदैवत पू. भार्गवराम यांच्‍या रूपात आले आहे’, असे वाटून पुरोहितांंचा भाव जागृत होणे : एका पुरोहितांचे कुलदैवत ‘भार्गवराम’ आहे. एकदा त्‍यांच्‍या घरी एक कार्यक्रम होता. त्‍यांनी मला ‘पू. भार्गवराम यांना अवश्‍य घेऊन यावे’, अशी विनंती केल्‍याने मी पू. भार्गवराम यांना त्‍यांच्‍या घरी नेले. पू. भार्गवराम यांना पहाताच त्‍या पुरोहितांचा भाव जागृत झाला. ते म्‍हणाले, ‘‘माझे कुलदैवत बालरूपात आले आहे.’’ त्‍यांनी पू. भार्गवराम यांचे पुष्‍कळ लाड केले.

३ आ. शिबिरातील व्‍यक्‍तींनी ‘पू. भार्गवराम’ यांचे नाव स्‍मरणात ठेवणे : पू. भार्गवराम एका मंदिरातील संस्‍कार शिबिर आणि संस्‍कृत भारती केंद्रातील शिबिर यांत सहभागी झाले होते. तेथे आलेल्‍या सर्व व्‍यक्‍ती आणि अध्‍यापिका यांनी पू. भार्गवराम यांचे नाव स्‍मरणात ठेवले. अन्‍यत्र ते आम्‍हाला कधी भेटले, तर ते ‘भार्गवराम’ हे नाव लक्षात ठेवून पू. भार्गवराम यांना संबोधतात.

३ इ. दुकानदार आणि पुरोहित यांनी पू. भार्गवराम यांना त्‍यांच्‍या नावाने संबोधणे : आम्‍ही कधी दुकानांत किंवा मंदिरात गेल्‍यास काही दुकानदार आणि पुरोहित पू. भार्गवराम यांना नाव विचारतात. नंतर आम्‍ही कधी त्‍या ठिकाणी गेल्‍यास ते ‘‘पू. भार्गवराम यांना काय हवे ?’’, असे त्‍यांचे नाव लक्षात ठेवून विचारतात. तेव्‍हा मला फार आश्‍चर्य वाटते.

३ ई. पू. भार्गवराम यांना त्‍यांचे नाव विचारल्‍यावर ते ‘भार्गवराम प्रभु’ असे सांगतात. तेव्‍हा बहुतांशी लोक पू. भार्गवराम यांचे नाव पुनःपुन्‍हा उच्‍चारत म्‍हणतात, ‘‘किती चांगले नाव आहे !’’ काही लोक सांगतात, ‘‘हे परशुरामाचे नाव आहे.’’

३ उ. एकदा आम्‍ही एका कार्यक्रमासाठी मैसुरू येथे गेलो होतो. तेथे मार्गात आमची एका अपरिचित व्‍यक्‍तीशी भेट झाली. त्‍या वेळी ‘भार्गवराम’ हे नाव ऐकून ती व्‍यक्‍ती पू. भार्गवराम यांचे चरण पकडून म्‍हणाली, ‘‘तुम्‍ही खरोखरच भार्गवराम आहात. या मुलामध्‍ये मला भार्गवराम दिसतात.’’

४. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘पू. भार्गवराम’ असे म्‍हणतात, त्‍या वेळी मला जाणवते, ‘त्‍यांची अपार कृपादृष्‍टी आणि असीम प्रीती यांचा पू. भार्गवराम यांच्‍यावर वर्षाव होत आहे.’ तेव्‍हा माझा भाव जागृत होतो.

५. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘पू. भार्गवराम’ असे नामकरण केले आहे. ‘त्‍यांनी या माध्‍यमातून पू. भार्गवराम यांना शक्‍ती, चैतन्‍य आणि पुष्‍कळ आशीर्वाद दिले आहेत’, असे मला जाणवते.

मी गुरुदेवांच्‍या चरणी हे विचार समर्पित करते. गुरुदेवा, आपणच मला प्रत्‍येक क्षणी पू. भार्गवराम यांचे स्‍मरण करण्‍याची संधी देऊन माझा उद्धार करून घेत आहात. आपल्‍या चरणी मनःपूर्वक कृतज्ञता !’

– सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), मंगळुरू. (२०.४.२०२३)

सनातनच्‍या ४४ व्‍या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी त्‍यांचे पणतू पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांनी त्‍यांची पाद्यपूजा करणे

पू. राधा प्रभुआजी

‘१०.४.२०२३ या दिवशी माझा वाढदिवस आहे’, हे ठाऊक असूनही मी त्‍याला तेवढे महत्त्व दिले नाही. मी नेहमीप्रमाणे सकाळी स्नान करून अल्‍पाहार करण्‍यासाठी जाणार होते. त्‍या वेळी पू. भार्गवराम (माझे पणतू) ओंजळ भरून फुले घेऊन माझ्‍या खोलीत आले. त्‍यांनी मला मंचावर बसायला सांगितले. त्‍यांनी माझ्‍या चरणांसमोर फुले ओळीने रचली. मी त्‍यांना विचारले, ‘‘तुम्‍ही हे काय करत आहात ?’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘आज तुमचा वाढदिवस आहे; म्‍हणून तुमची पाद्यपूजा करून तुम्‍हाला नमस्‍कार करायला आलो आहे.’’

पू. भार्गवराम यांनी केलेली पू. (श्रीमती) राधा प्रभु यांची पाद्यपूजा

त्‍यांचे बोलणे ऐकून माझी पुष्‍कळ भावजागृती झाली. मी त्‍यांच्‍यावर प्रेमाचा पुष्‍कळ वर्षाव करून त्‍यांची पापी घेतली.

(‘पू. भार्गवराम यांनी अन्‍य लहान मुलांप्रमाणे पू. राधा प्रभु यांना केवळ नमस्‍कार न करता त्‍यांची पाद्यपूजा केली. यातून पू. भार्गवराम यांच्‍यात लहान वयातच असलेली प्रगल्‍भता आणि त्‍यांचे असामान्‍यत्‍व लक्षात येते.’ – संकलक)

– पू. राधा प्रभु (पू. भार्गवराम यांच्‍या पणजी), मंगळुरू (१५.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक