नक्षलवाद्यांच्या आक्रमणात हुतात्मा झालेल्या १० पैकी ८ सैनिक हे पूर्वाश्रमीचे नक्षलवादी
जगदलपूर (छत्तीसगड) – २६ एप्रिल या दिवशी झालेल्या नक्षलवाद्यांच्या आक्रमणात १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. धारातीर्थी पडलेल्या १० पैकी ८ सैनिक हे पूर्वाश्रमीचे नक्षलवादीच होते; परंतु शरणागती पत्करून ते मुख्य प्रवाहात सहभागी झाले. यांपैकी एका सैनिकाचे नातेवाईक म्हणाले, ‘यापुढे आमचे कुटुंब हे हुतात्म्याचे कुटुंब म्हणून ओळखले जाईल. नक्षलवादाचा कलंक कपाळी घेऊन मरण्यापेक्षा सैन्याचा वेश घालून धारातीर्थी पडणे लाख पटींनी चांगले !’
नक्षलवादी आक्रमणात मृत्यू पावलेल्या सैनिकाच्या चितेवर पत्नी झोपली !
नक्षलवाद्यांच्या आक्रमणात वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकांचे अंत्यसंस्कार केले जात आहेत. अशातच कवासीपुरा येथे सैनिक राजू करटम यांचा मृतदेह त्यांच्या गावी पोचला असता त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या पत्नीने मृतदेहाला कवटाळले. अंत्यविधी चालू होताच ती चितेवर झोपली आणि ‘पतीसमवेत मलाही जाळा’ असा हट्ट करू लागली. वडीलमंडळींनी तिची समजूत काढल्यावर कुठे अंत्यसंस्कार पूर्ण होऊ शकले.