नामजपामुळे अनुभूती आल्यावर गावागावांत जाऊन ‘सनातन संस्थे’चा तळमळीने प्रसार करणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पटना (बिहार) येथील सौ. आशा विनोद झा (वय ६२ वर्षे ) !

१. ‘सनातन संस्थे’शी संपर्क

सौ. आशा झा

१ अ. वर्ष २००१ मध्ये मन अस्वस्थ राहून रात्री झोप न येणे आणि ‘सनातन संस्थे’ने सांगितलेल्या नामजपांमुळे झोप लागून संस्थेविषयी जिज्ञासा निर्माण होणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या असीम कृपेने १४.१०.२००१ या दिवशी माझ्या निवासस्थानी ‘सनातन संस्थे’च्या वतीने प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्यापूर्वी माझी मोठी कन्या सौ. रूपम हिच्या मैत्रिणीचे आई-वडील नामजपाची माहिती सांगण्यासाठी आमच्या घरी नेहमी यायचे; परंतु आम्ही त्याकडे लक्ष द्यायचो नाही. त्या काळात मी नेहमी अस्वस्थ असायचे. मला रात्री झोप लागायची नाही. ११.१०.२००१ या दिवशी रात्री मी पुष्कळच अस्वस्थ होते. तेव्हा माझ्या यजमानांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप केला. त्यामुळे मला झोप लागली. सकाळी जाग आल्यावर मला पुष्कळ चांगले वाटत होते.

त्यानंतर आमच्या मनात ‘सनातन संस्थे’विषयी जिज्ञासा आणि आवड निर्माण झाली. नंतर मी नामजप करू लागले आणि आमच्या घरात ‘सनातन संस्थे’चा सत्संग चालू झाला.

२. सेवेला आरंभ

२ अ. प्रसारसेवेत नामपट्ट्यांचे वितरण करणे : १४.१०.२००१ पासून मी ‘सनातन संस्थे’ने सांगितल्याप्रमाणे धर्मप्रचार करण्याच्या सेवेला जाऊ लागले. सेवेला जातांना मी कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ यांच्या प्रत्येकी १०० नामपट्ट्या घेऊन जायचे. प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने सर्व नामपट्ट्या एका सप्ताहात वितरण व्हायच्या.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि कालीमातेचा नामजप यांमुळे साधिकेची प्रकृती निरोगी राहून तिला सेवा करता येणे अन् समाजातील लोकांचा त्रास दूर होण्यासाठी तिने नामजपाचा प्रसार करणे : आमची कुलदेवी ‘कालीमाता’ आहे. पूर्वी मी अंथरुणातून उठूही शकत नव्हते; परंतु कालीमातेच्या नामजपामुळे मला चालता येऊ लागले. पूर्वी मला एक चमचा पाणी पिणेही कठीण व्हायचे. आता मी सर्वकाही खाऊ-पिऊ शकते. खरेतर आधुनिक वैद्यांनी तेव्हा ‘माझे आयुष्य अल्प राहिले आहे’, असे सांगितले होते; परंतु मागील २२ वर्षांपासून मी निरोगी असून सर्व सेवा करत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि त्यांचे आशीर्वाद यांमुळेच हे घडले आहे. या अनुभूतीमुळे मला ऊर्जा मिळते. मी समाजात जाऊन प्रत्येक व्यक्तीला सांगते,  ‘आपल्या कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्याने ८० टक्के आध्यात्मिक त्रास दूर होतात. तुम्ही हे नामजप करून पहा.’ मी असे सांगते, तेव्हा लोक माझ्याकडून नामपट्टी घेतात आणि मासिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदारही होतात.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने गावोगावी जाऊन धर्मप्रचाराची सेवा करण्याची संधी मिळणे

सद्गुरु सत्यवान कदम, पू. संजीव कुमार, पू. (सौ.) माला कुमार आणि सौ. आशा ठक्कर या साधकांच्या सान्निध्यात मी सेवेला आरंभ केला. माझ्या यजमानांची नोकरी रेल्वेत असल्यामुळे त्यांचे सतत स्थानांतर (बदली) होत असे. त्यामुळे मला अनेक ठिकाणी जाऊन प्रचारसेवा करण्याची संधी मिळाली. गुरुदेवांनी आजपर्यंत माझ्याकडून पुढील सेवा करून घेतल्या आहेत.

३ अ. संसारातील सर्व कर्तव्ये पूर्ण करून धनबाद, भूली, कुसुण्डा आदी ठिकाणी सत्संग घेण्यासाठी जाणे : वर्ष २००४ पर्यंत मी स्थानिक साधकांसह धनबाद (झारखंड) शहरात प्रवचन करणे, मासिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे आणि वितरण करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे इत्यादी सेवा करत होते. त्या वेळी मी यजमानांसह धनबाद, भूली आणि कुसुण्डा (धनबादजवळील गावे) अशा अनेक ठिकाणी सत्संग घेण्यासाठी जात होते. तेव्हा माझी मुले लहान होती, तरीही संसारातील सर्व कर्तव्ये पूर्ण करून मी धर्मप्रचार करत होते.

३ आ. गुरुदेवांच्या कृपेने बिहारमध्ये सनातन संस्थेच्या कार्याला आरंभ होणे : वर्ष २००४ ते वर्ष २००९ पर्यंत मी समस्तीपूर (बिहारमधील एक जिल्हा) येथे राहून सेवा केली. गुरुदेवांच्या कृपेने बिहारमध्ये प्रथमच ‘सनातन संस्थे’च्या कार्याचे बीजारोपण झाले. लोकांना हळूहळू ‘सनातन संस्थे’चा उद्देश आणि कार्य सांगितले जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्यात राष्ट्र्र, धर्म आणि आपली संस्कृती यांच्याप्रती आवड निर्माण झाली. नंतर मी जिज्ञासूंना मासिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवले आणि नामजप अन् सत्संग यांची माहिती दिली. त्या वेळी मी समस्तीपूर येथे राहून दरभंगा (बिहारमधील एक जिल्हा), वारिसनगर (बिहारमधील एक गाव), तसेच मुजफ्फरपूर (बिहारमधील एक शहर) येथे प्रवचन करण्यासाठी जात होते. गुरुकृपेने माझी धाकटी कन्या मनीषा हिचा विवाह मुजफ्फरपूरमध्येच झाला. त्यामुळे मला तेथे प्रचार करणे अधिक सोपे झाले.

३ इ. मुजफ्फरपूर, मोतिहारी आणि जवळपासच्या गावांमध्ये जाऊन प्रवचन अन् सत्संग यांच्या माध्यमांतून प्रचार करणे : नंतर माझ्या यजमानांचे मुजफ्फरपूर येथे स्थानांतर झाले. आम्ही तेथील लोकांना ‘सनातन संस्थे’ची माहिती दिली आणि धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी सत्संग, प्रवचने अन् ग्रंथ यांच्या माध्यमांतून लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे मी जवळपासची गावे, तसेच दूरच्या मोतिहारी (बिहारमधील एक जिल्हा) येथे जाऊनही प्रचार करत होते. वर्ष २०११ पर्यंत आम्ही येथे राहिलो.

३ ई. गया येथे गावोगावी जाऊन धर्मप्रचार ! : गया (बिहारमधील एक शहर) येथे गेल्यावर मी गुरुदेव आणि भगवान श्रीविष्णु यांना ‘या देवनगरीत ‘सनातन संस्थे’चा प्रचार व्हावा, येथील लोकांमध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी जागृती व्हावी’, अशी प्रार्थना करायचे. माझे पती श्री. विनोद झा उच्च पदावर अधिकारी होते. त्यांना पुष्कळ लोक ओळखायचे. त्याचा मला प्रचार करतांना लाभ झाला. त्या वेळी काही जण मी करत असलेल्या कार्याविषयी माझ्या यजमानांशी नकारात्मक रितीनेही बोलायचे; परंतु यजमान त्या लोकांना समजावून सांगायचे. माझ्या यजमानांकडून मला पुष्कळ सहकार्य मिळाले. येथे मी वर्ष २०१३ पर्यंत सेवा केली.

३ उ. पं. दीनदयाळ उपाध्याय नगर (जुने नाव – मुगलसराय) : वर्ष २०१५ पर्यंत मला पं. दीनदयाळ उपाध्याय नगर (जुने नाव – मुगलसराय, उत्तरप्रदेशमधील एक शहर) या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. येथे मी अधिकाधिक लोकांना ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार केले.

३ ऊ. दानापूर (पटना, बिहार) येथे रेल्वेच्या अधिकार्‍यांसाठी प्रवचन करणे : वर्ष २०१६ मध्ये आम्ही दानापूर (पटना, बिहार) येथे आलो. गुरुकृपेने मला निरंतर सेवा करण्याची संधी मिळत गेली. येथे मी रेल्वेच्या अधिकार्‍यांसाठी प्रवचन करून त्यांना साधना सांगितली.

अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला बिहारच्या अन्य भागांतही सत्संग घेण्याची संधी मिळाली.

३ ए. बिहार, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आदी राज्यांत धर्मप्रचारसेवा करणे : गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून बिहार येथील पटना, लहेरियासराय, हाजीपूर, सोनपूर, बरौनी, जटमलपूर (समस्तीपूर) आणि छपरा येथे; हरियाणातील फरीदाबाद, गुडगांव येथे, तसेच रांची (झारखंडची राजधानी) आणि मुंबई येथेही धर्मप्रचाराची सेवा झाली. माझा मोठा मुलगा बेंगळुरू (कर्नाटक) येथे, तर धाकटा मुलगा पुणे (महाराष्ट्र) येथे नोकरी करतो. तेथे गेल्यावरही मी तेथील अनेकांना साधनेविषयी सांगते.

४. बाहेर जातांना ग्रंथ, प्रसारसाहित्य, नामपट्ट्या स्वतःसमवेत ठेवणे आणि संधी मिळताच साधनेविषयी माहिती सांगणे

मी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, प्रसारसाहित्य, नामपट्ट्या आदी सर्व साहित्य नेहमी माझ्या समवेत ठेवते. मी रेल्वेने प्रवास करतांना विविध रेल्वेस्थानकांवर, तसेच भाजीमंडईत गेल्यावर तेथेही प्रसार करते. महाविद्यालये, शाळा, अधिकोष आदी ठिकाणी जाऊन प्रवचन करणे, ग्रंथ आणि पंचांग वितरण करणे या सेवा करते. मी चिकित्सालयांत जाऊन तेथील आधुनिक वैद्य (डॉक्टर), परिचारिका आणि रुग्ण, तसेच हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते यांच्यासाठी प्रवचन करून साधना सांगते. अशा प्रकारे गुरुदेवांनी माझ्याकडून सर्व प्रकारच्या सेवा करून घेतल्या आहेत.

वर्ष २०१८ मध्ये माझे यजमान सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून मी पटनामध्ये राहून यजमानांसह धर्मप्रचाराची सेवा करत आहे. गुरुकृपा आणि परिवारातील सदस्यांचे सहकार्य यांमुळे मी ही सेवा करू शकत आहे.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद्गुरु आणि संतजन यांच्या कोमल चरणी भावपूर्ण नमस्कार अन् कोटीशः

कृतज्ञता !’

– सौ. आशा विनोद झा (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६२ वर्षे), पटना, बिहार. (३.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक