अन्न पदार्थांच्या रंगांची आरोग्यासाठी उपयुक्तता !

१. जीवन आनंदी राखण्यात निसर्गाचा मोठा वाटा

‘रंग हे विश्वाच्या सौंदर्याचे सार आहे. अगदी आकाशाचा रंग निळा, झाडांचा हिरवा, विविध फुलांचे अनेक रंग, इंद्रधुनष्याचे सप्तरंग. विचार करा ना, हे सगळे रंग नाहीसे झाले, तर ही सृष्टी आणि पर्यायाने आपले जीवन किती निरस होईल.

२. स्वतःचा आहार नैसर्गिक रंगांनी परिपूर्ण हवा !

जी गोष्ट दृष्टीची तीच आपल्या आहाराची ! कल्पना करा पांढर्‍या शुभ्र भातावर पांढरेच वरण, फिकट पांढरी चपाती, भाकरीशी खायला पांढरीच भाजी, आमटी, चटणी, कोशिंबीर हे सर्व पांढरे, पांढरी जिलेबी, पांढरा लाडू, पांढरा गुलाबजाम, पांढरा आंबा खाण्याची इच्छा तरी होईल का ? अन्नातील ही रंगांची विविधता केवळ नेत्रसुखासाठी नसून त्याही पुढे जाऊन उपयुक्त आहे. प्रत्येक रंगाचे आपल्या आहारात एक विशिष्ट स्थान आहे. नव्हे असायलाच पाहिजे; म्हणूनच आपला आहार हा नैसर्गिक रंगांनी परिपूर्ण असावा.

३. अन्न पदार्थातील रंगांचे महत्त्व !

३ अ. लाल रंग : हा आपले रक्त आणि मांसपेशी यांचा रंग आहे. लाल रंगाचा समावेश असणारा आहार आपल्या शरिरातील चेतना जागृत करतो, रक्त वाढवतो आणि निरोगी ठेवतो. हा रंग मूळ उष्ण गुणाचा असल्याने शरीर आनंदी आणि चपळ ठेवायला साहाय्य करतो. उदा. टॉमेटो, बीट, सफरचंद, लाल मुळा, लाल माठ, नाचणी, खजूर, स्ट्रॉबेरी आणि चेरी इत्यादी.

३ आ. केसरी रंग : पहाटेच्या आकाशाचा हा रंग शरिरातील नवनिर्माण आणि उत्स्फूर्ततेस कारणीभूत ठरतो. यात ‘अ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. डोळे आणि त्वचा यांसाठी गुणकारी असतो. उदा. गाजर, पपई, मोसंबी, मसूर डाळ इत्यादी मुळातून उष्ण असलेला हा रंग शरिरातील उष्णता समतोल करण्यास साहाय्य करतो.

३ इ. पिवळा रंग : थंड प्रवृत्तीच्या माणसामध्ये उष्णता निर्माण करणे हे या रंगाचे प्रमुख काम ! शरिरातील अग्नी प्रज्वलित करण्यासह चयापचयाची क्रिया नियमित करण्यास साहाय्य करतो. यामध्येही ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात सापडते. उदा. आंबा, केळी, पिवळी ढोबळी, अननस, तसेच सर्व प्रकारच्या डाळी आणि गूळ इत्यादी.

३ ई. हिरवा रंग : हा रंग चैतन्य, निर्मिती, ऊर्जा आणि वाढ यांचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे शांत आणि थंड प्रवृत्तीचा आहे. शरिरातील मृत पेशी दूर करून आरोग्यक्षम नवीन पेशी निर्माण करणे आणि प्रतिकारशक्ती वाढवून रोगांना दूर ठेवणे, हे या रंगाचे काम असते. नेत्र सुखद असणारा हा रंग तेवढाच आरोग्यक्षमही आहे. उदा. सर्व हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळे.

३ उ. पांढरा रंग : हा ‘सर्वसमावेशक रंग’ म्हणून ओळखला जातो. या रंगाच्या अन्न पदार्थांत अनेक गुण एकवटलेले असतात. तसेच शरिरातील शक्तींचे संतुलन राखण्याचे काम हा रंग करतो. त्याचप्रमाणे आपल्या शरिराचा भार पेलणार्‍या हाडांचाही हाच रंग असल्याने त्यांच्या मजबूतीचेही काम करतो. याचे उत्तम उदाहरण, म्हणजे दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि पांढरा कांदा इत्यादी.

३ ऊ. निळा रंग : निसर्गात भरपूर प्रमाणात आढळणारा निळा रंग पाण्याच्या रूपात शरिरात गेल्यास शरीर स्वच्छ, निर्मळ आणि निरोगी ठेवण्यास साहाय्य करतो.

३ ए. जांभळा रंग : जांभळा रंग लाल आणि निळा यांच्या मिश्रणातून सिद्ध होणारा आहे. हा रंग शरिरातील ऊर्जा आणि ती निर्माण करणार्‍या गोष्टी यांचे (पर्यायाने साखरेचे) संतुलन करतो. त्यासाठी जांभूळ, करवंदे यांचा आहारात समावेश असावा.

३ ऐ. काळा रंग : कार्बनच्या रूपात अशुद्धता शोषून शुद्धता स्थापित करण्यासाठी हा रंग प्रसिद्ध आहे. विषारी ठरू शकणारे पदार्थ आणि वायू शरिरातून शोषून बाहेर टाकणे हे याचे काम. यासाठी काळी द्राक्षे, मनुका, योग्य प्रमाणात मोहरी आणि लोखंडाच्या कढईत शिजवलेल्या भाज्या यांचा आहारात अवश्य समावेश असावा.’

(साभार : मासिक ‘वेदायन’, दिवाळी २०१२)