Jai Shree Ram : ‘जय श्रीराम’ म्हटल्यामुळे हिंदूंना भोगावा लागला कारावास !

स्थानिक मुसलमान समाजाच्या दबावामुळे पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप !

मीरारोड (जिल्हा ठाणे) – हनुमान जयंतीच्या दिवशी येथील नयानगर भागातील सार्वजनिक लोढा रस्त्यावरील महंमदी मशिदीजवळून काही हिंदू दुचाकीवरून भगवे ध्वज हाता धरून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत जात होते. या प्रकरणी ४ हिंदु युवकांना पोलिसांनी अटक केली होती. तेथील उपस्थित मुसलमान समाजाच्या दबावामुळे ही अटक केल्याचे समजते. या युवकांना न्यायालयाने १० एप्रिल या दिवशी जामिनावर सोडले आहे. ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक आणि धर्माभिमानी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी या युवकांना विनामूल्य कायदेशीर साहाय्य केले. (असे हिंदु अधिवक्ता हीच हिंदु धर्माची शक्ती ! – संपादक)  

या घटना ज्या परिसरात घडली, तो मुसलमानबहुल भाग आहे. या घटनेत हिंदु युवक दुचाकीवरून जात असतांना उपस्थित असलेल्या मुसलमानांच्या जमावाने त्यांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. काही वेळातच त्याच परिसरात गस्त घालणारे पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आय.पी.सी.चे कलम १५३ ए (एखादा धर्म, समूह अथवा वंश यांच्यावर आघात करणे), १४३ आणि १२० बी नोंद करून त्वरित प्रथम माहिती अहवाल प्रविष्ट केला.

या घटनेविषयी प्रतिक्रिया देतांना अधिवक्ता खुश खंडेलवाल म्हणाले,

अधिवक्ता खुश खंडेलवाल

१. ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे अटक करणे हे ‘१५३ ए’ किंवा अन्य कुठल्याही कलमात बसत नाही. जर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणे हा गुन्हा ठरत असेल, तर प्रतिदिन भोंग्यांवरून अजानमुळे हिंदूंना पूजा करण्यात व्यत्यय आणणे, तसेच ध्वनीप्रदूषण करून सर्व नागरिकांनाही त्रास देणे यांप्रकरणी मशिदींवरही कारवाई करायला हवी.

२. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत देश ‘प्रादेशिकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष’ मानला जातो. त्यामुळे ‘अमुक क्षेत्र मुसलमानबहुल आहे’, असे कारण पुढे करून तिथे वावरणार्‍या हिंदु धर्मीय किंवा अन्य पंथीय यांच्या लोकांवर गुन्हे नोंदवणे चुकीचे आहे.

३. गुन्हे नोंद करून हिंदूंंना जाणीवपूर्वक त्रास देणार्‍यांच्या विरोधात आमचा कायदेशीर लढा चालूच राहील.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या देशात हिंदूंना त्यांच्या देवतेच्या नावाचा जयघोषही मोकळेपणाने करता येत नाही. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • मुसलमानांच्या दबावामुळे पोलीस हिंदूंना लगेच पकडतात. हिंदूंनी कितीही विनवण्या केल्या, तरी पोलीस धर्मांधांवर गुन्हे नोंद करत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • हिंदुत्वनिष्ठ शासनाच्या काळात देवाचा जयघोष केल्याविषयी युवकांवर गुन्हे नोंद होऊन त्यांना ५ दिवस कारागृहात रहावे लागणे, हे दुर्दैवी ! छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असा प्रकार घडणे, हे संतापजनक !