‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. शाश्वत स्वस्तिक सावंत हा या पिढीतील एक आहे !
चैत्र कृष्ण सप्तमी (१२.४.२०२३) या दिवशी चि. शाश्वत स्वस्तिक सावंत याचा दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. शाश्वत स्वस्तिक सावंत याला दुसर्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भधारणा झाल्याच्या पहिल्या मासात कोरोना झाल्यामुळे ‘कोविड केअर सेंटर’मध्ये भरती होणे : ‘मला गर्भधारणा झाल्याच्या पहिल्या मासात आम्हाला (माझा आणि माझे यजमान श्री. स्वस्तिक यांना) कोरोना झाला. त्यामुळे आम्हा दोघांनाही ‘कोविड केअर सेंटर’मध्ये भरती व्हावे लागले. तेथे आम्ही पहाटे लवकर उठून नामजप करत होतो आणि अन्य वेळी ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकत होतो. आम्ही तेथे असतांना आम्हाला कधीही भीती वाटली नाही. आधुनिक वैद्य आम्हाला नियमितपणे तपासत असत.
१ आ. त्र्यंबकेश्वर येथे ‘नारायण नागबली’ हा विधी करायला जातांना अडथळे येणे; मात्र नंतर विधी व्यवस्थित पार पडणे : नाडी ज्योतिषाने आम्हाला ‘नारायण नागबली’ हा विधी करायला सांगितले होते. गर्भधारणेच्या ५ व्या मासात आम्ही हा विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे जातांना २ वेळा आमच्या चारचाकी गाडीचे टायर फुटले. याविषयी विधी करणार्या गुरुजींना विचारल्यावर ‘‘त्यांनी हा विधी करतांना अडथळे येतातच’’, असे सांगितले.
विधी चालू करतांना आणि संपल्यावर आम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिरातून शंखनाद आणि घंटानाद ऐकू आला. आमचे विधी करण्याचे ठिकाण मंदिराच्या शेजारी असल्याने आम्हाला समोर मंदिराचा कळस दिसत होता. आमचा विधीही छान पार पडला.
१ इ. भाववृद्धी सत्संगात लावलेले दत्ताचे भजन ऐकतांना पोटातील बाळाची हालचाल अधिक जाणवणे : दत्तजयंतीनिमित्त असलेल्या भाववृद्धी सत्संगात ‘जय करुणाकर ..’, हे भजन चालू असतांना पोटातील बाळाला आनंद झाल्यामुळे ते अधिक प्रमाणात हालचाल करू लागले.
प्रत्यक्षात मी श्री क्षेत्र गाणगापूर कधीही पाहिले नाही. भाववृद्धी सत्संगात गाणगापूरची माहिती सांगितली जात होती, तेव्हा मला ते दृश्य डोळ्यांसमोर दिसू लागले. ‘तेथील नदीत स्नानासाठी जात असतांना माझ्या बाळाला नद्यांचे पाणी लागल्याने ते तेजस्वी दिसत आहे’, असे मला दिसले.
१ ई. नामजप करत असतांना सूक्ष्मातून सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे दर्शन होणे आणि त्यांनी आशीर्वाद देणे : एकदा मी नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे दर्शन झाले. त्यांना पाहिल्यावर पोटातील बाळ अधिकच हालचाल करू लागले. त्या मला म्हणाल्या, ‘तुझी पुढे प्रगती होणार आहे.’ नंतर त्या दिसेनाशा झाल्या.
१ उ. ‘प्रसुती सुखरूप होऊ दे’, अशी गुरुदेवांना मनोमनी प्रार्थना होणे : गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त (२.५.२०२१ या दिवशी) प्रकाशित केलेला दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना श्रीरामाच्या रूपातील छायाचित्राकडे पहातांना मला परम पूज्यांचे डोळे तेजस्वी दिसू लागले. हा सोहळा पहात असतांना मी मनोमनी ‘प्रसुती सुखरूप होवो’, अशी त्यांना प्रार्थना करत होते.
२. जन्मानंतर
२ अ. बाळाची ‘क्ष’ किरण तपासणी केली असता ‘बाळाच्या डाव्या हाताचे हाड भंग झाले आहे’, असे लक्षात येणे आणि त्याच्यावर उपचार होत असतांना ते शांत रहाणे : ३.५.२०२१ या दिवशी माझी प्रसुती होऊन मला मुलगा झाला. आधुनिक वैद्यांनी सगळे सुखरूप असल्याचे सांगितले. काही वेळानंतर आधुनिक वैद्यांच्या लक्षात आले, ‘बाळ उचलून घेतल्यावर रडत आहे आणि खाली ठेवल्यावर शांत होत आहे.’ बाळाची क्ष किरण तपासणी केली असता लक्षात आले, ‘बाळाच्या डाव्या हाताचे हाड भंग झाले आहे.’ तेव्हा त्वरित बाळाला लहान मुलांच्या रुग्णालयात नेले. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘हा ‘बर्थ इंज्युरी’चा प्रकार आहे. त्यामुळे आणखी काही ठिकाणी ‘फ्रॅक्चर’ असण्याची शक्यता आहे.’’ त्यांनी बाळाच्या संपूर्ण शरिराची ‘क्ष’ किरण तपासणी करायला सांगितली. त्यात बाळाला अन्य ठिकाणी ‘फ्रॅक्चर’ झाल्याचे दिसले नाही. तेव्हा आधुनिक वैद्य आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर बाळाला पट्टी बांधून घरी पाठवण्यात आले. हे सगळे होत असतांना बाळ मुळीच रडले नाही. ते डोळे उघडे ठेवून बघत होते. त्या नंतरच्या प्रत्येक भेटीच्या वेळी बाळ शांतपणे उपचार करून घेत असे.
२ आ. एक मास ते १ वर्ष
१. बाळ त्याच्या पाळण्यासमोर असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे एकटक बघत असे.
२. तो श्रीरामाचा पाळणा ऐकूनच झोपतो.
३. शाश्वत ३ मासांचा असतांना एकदा त्याची मोठी बहीण कु. सानिध्या (वय ९ वर्षे) देवाची प्रार्थना करत असतांना शाश्वतनेही ‘देव’ हा शब्द उच्चारला.
४. तो ४ मासांचा असल्यापासून अनेक वेळा आम्ही रात्रीचा प्रवास केला; पण त्याने प्रवासात त्रास दिला नाही.
५. तो ५ मासांचा असल्यापासून सकाळच्या वेळी कापूर आरती लावल्यावर त्याला पुष्कळ आनंद होतो.
६. साधकांच्या सहवासात आल्यावर त्याला आनंद होतो, हे मला सेवेसाठी देवद आश्रमात गेल्यावर कळले.
७. दादर येथे निघालेल्या हिंदु एकता दिंडीमध्ये आम्ही सहभागी झालो होतो. तेव्हा त्याने कोणताही त्रास दिला नाही.
३. स्वभावदोष : हट्टीपणा’
– सौ. सदिच्छा स्वस्तिक सावंत (शाश्वतची आई), कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र (४.७.२०२२)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |