श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेला भक्तीसत्संग ऐकतांना ध्यानस्थ स्थिती अनुभवून सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
सौ. आनंदी पांगुळ

१. भक्तीसत्संग ऐकतांना ‘खोल खोल स्थितीत आहे’, असे जाणवणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ करत असलेल्या मार्गदर्शनाचे दृश्य डोळ्यांसमोर येणे

साधकांसाठी भक्तीसत्संग घेतात. भक्तीसत्संग चालू असतांना मला आध्यात्मिक त्रासामुळे ग्लानी येते. १२.५.२०२२ या दिवशी चालू असलेल्या भक्तीसत्संगातही आरंभी काही वेळ मला ग्लानी येत होती; परंतु नंतर माझ्या लक्षात आले, ‘मला सत्संग ऐकू येत आहे, बोलणे समजत आहे; मात्र मी खोल खोल स्थितीत आहे.’ सत्संगाच्या शेवटच्या अर्ध्या घंट्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ करत असलेल्या मार्गदर्शनाचे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागले.

२. सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये

अ. मला दिसले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या शेजारी २ – ३ साधिका बसल्या आहेत. नंतर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ अकस्मात् मार्गदर्शन करायच्या थांबल्या. त्या डोळे बंद करून ध्यानावस्थेत गेल्या. त्यांच्या समवेत असलेल्या २ – ३ साधिकाही ध्यानावस्थेत होत्या.

आ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ध्यानावस्थेत आहेत’, असे मला दिसत होते; परंतु ‘त्यांच्या स्वरात सत्संग चालू आहे’, असे मला ऐकू येत होते.

इ. मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणांजवळ ‘त्यांच्या चरणांचा अंगठा माझ्या आज्ञाचक्राला लागेल’, अशा पद्धतीने मी झोपले होते.

ई. काही सेकंद श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची दैवी वाणी ऐकू येत होती. त्यातील चैतन्याने सर्व जण ध्यानावस्थेत गेले होते.’ त्या वेळी मला माझ्या आज्ञाचक्रावर शक्तीची स्पंदने जाणवत होती. मला हे दृश्य काही सेकंद दिसत होते. थोड्या वेळाने मला जाग आली. तेव्हा मला माझ्या आज्ञाचक्रावर प्रत्यक्षातही स्पंदने जाणवत होती आणि मला उत्साह जाणवत होता.

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.५.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक