‘एच्.३ एन्. २’ या विषाणूचा संसर्ग वाढत असतांना घ्‍यावयाची काळजी

सध्‍या ‘एच्.३ एन्. २’ या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. यामध्‍ये एका वृद्ध रुग्‍णाचा मृत्‍यू झाला. या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्‍यांनी कोणती काळजी घ्‍यावी ? याविषयीची माहिती येथे देत आहे.

वसंत ऋतू असल्‍यामुळे आणि त्‍यातच पाऊस, ढगाळ वातावरण यांमुळे सर्दी, खोकला, ताप, दमा इत्‍यादी त्रास वाढल्‍याचे आढळून येत आहे. विकार गंभीर नाही, तसेच ‘फ्‍ल्‍यू’ किंवा विषाणूजन्‍य विकार असल्‍याने ‘अँटिबायोटिक्‍स’ (प्रतिजैविके)ची आवश्‍यकता नसल्‍याचे तज्ञ सांगत आहेत. तरीही रुग्‍ण प्रतिजैविके घेऊन ‘त्‍यानेही फरक जाणवला नाही’, असे सांगत आहेत.

एकतर आवश्‍यकता नसतांना प्रतिजैविके दिली जात आहेत. दुसरे म्‍हणजे साध्‍या उपचारांनी भेद जाणवत नाही म्‍हणून प्रतिजैविके दिली जात आहेत. त्‍यामुळे त्‍यांचे दुष्‍परिणाम हा त्‍या तक्रारीत भर घालणारा मुद्दा आहे. सध्‍या विकाराची व्‍याप्‍ती वाढत आहे. त्‍यामुळे विकाराचे गांभीर्य वाढण्‍याआधीच सर्वांनीच पुढील काळजी घ्‍यायला हवी.

१. गरम किंवा कोमटच पाणी प्‍यावे.

२. थंड पदार्थ खाणे-पिणे पूर्ण बंद करावेत.

३. दही, लस्‍सी, ताक, विविध सरबते, कैरी, लोणची, मेयॉनिज चीज, ब्रेड, विकतचे / जड पदार्थ, अकाली फळे, मिठाई इत्‍यादी बंदच ठेवावे.

४. दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे टाळावे. भूक लागल्‍यावरच पचनशक्‍तीनुसार खावे.

५. पथ्‍यकर आहार-विहार ठेवावा.

६. प्राणायाम, सूर्यनमस्‍कार इत्‍यादी घरी करता येतील, असे व्‍यायाम करावेत.

काहीही त्रास वाटला, तर तो वाढू नये म्‍हणून आपल्‍या वैद्यांना संपर्क करा. ते अधिक हिताचे राहील.

– वैद्या तनुजा गोखले, पुणे. (१६.३.२०२३) (साभार : सामाजिक माध्‍यम)