साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
रेल्वे स्थानकांवर, तसेच रेल्वेत प्रवाशांचे भ्रमणभाष, लॅपटॉप (भ्रमणसंगणक), पैसे, सामान आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेत चोरी करणारे चोर १६ ते ४० वर्षे या वयोगटातील असतात, असे निदर्शनास आले आहे. तसेच चोरी झालेले सामानही मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी आर्थिक हानी होते. हे टाळण्यासाठी, तसेच सतर्क रहाण्यासाठी काय करू शकतो ?, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. प्रवासात चोरी करण्याच्या काही पद्धती !
अ. रेल्वेत चढतांना आणि उतरतांना रेल्वेच्या डब्याच्या (बोगीच्या) दारापाशी प्रवाशांची गर्दी होते. २ – ३ बॅगा समवेत असलेला प्रवासी रेल्वेत चढत असतांना त्याचे पाकीट किंवा अन्य वस्तू (भ्रमणभाष आणि दागिने) चोरण्याचे प्रमाण अधिक आहे.
आ. कधी कधी सिग्नल मिळण्यासाठी रेल्वे १० ते २० मिनिटे निर्जनस्थळी अथवा लहान रेल्वेस्थानकावर थांबते. त्या वेळी या टोळीतील चोर वेगवेगळ्या डब्यांमध्ये चढतात. ते महिला आणि अन्य प्रवासी यांच्या साहित्याचे निरीक्षण (रेकी) करतात. रेल्वेला ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत हे चोर कोणतीही कृती करत नाहीत. रेल्वे सुटल्यानंतर ते महिला प्रवाशांच्या पर्स आणि दागिने चपळतेने ओढून घेतात अन् चालत्या रेल्वेतूून रेल्वे फलाटाच्या (प्लॅटफॉर्मच्या) विरुद्ध बाजूने उडी मारून पसार होतात. यामुळे चोराला पकडण्याची संधी मिळत नाही. सर्वसाधारणपणे या चोर्या धावत्या गाडीत रात्री-अपरात्री किंवा प्रवासी बेसावध असतांना केल्या जातात.
इ. कधी कधी चोरांचे टोळके गटाने येऊन सर्वसामान्य व्यक्ती वा मध्यमवर्गीय असल्याचे भासवतात. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्याविषयी संशय येत नाही. नंतर हे चोर प्रवाशांशी जवळीक साधून त्यांना फसवतात. प्रवाशांना गुंगी आणणारे खाण्या-पिण्याचे पदार्थ देऊन प्रवाशी बेशुद्ध झाल्यावर वा प्रवाशाचे भान हरपल्यावर चोरी केली जाते. असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.
२. रेल्वेत चोरी झाल्यास प्रवाशाला रेल्वेकडून हानीभरपाई मिळते, हे लक्षात घ्या !
धावत्या रेल्वेत आरक्षण असलेल्या प्रवाशाच्या सामानाची चोरी प्रवासाच्या दरम्यान झाली, तर प्रवाशाला रेल्वेने त्याची हानीभरपाई दिली पाहिजे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. हे बहुतांश लोकांना ठाऊक नसते. त्यामुळे ते त्या संदर्भात कृती करत नाहीत.
धावत्या रेल्वेत आरक्षण असलेल्या प्रवाशाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्याने रेल्वे पोलीस दलाकडे (Government Railway Police Force – GRPF कडे) जाऊन प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवणे आवश्यक आहे, तसेच प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवल्यावर रेल्वे पोलिसांकडून (GRPF कडून) प्रवाशाने ग्राहक मंचाच्या फॉर्मवर त्यांचा शिक्का घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये असा उल्लेख असतो की, जर प्रवाशाला ६ मासांच्या आत त्याचे सामान परत मिळाले नाही, तर तो त्या सामानाची हानीभरपाई मागण्यासाठी ग्राहक मंचाकडे जाऊ शकतो. सामानाच्या किमतीचे मूल्यांकन करून ग्राहक मंच रेल्वेला भरपाई देण्याचे आदेश देतो. केवळ चोरीच नव्हे, तर रेल्वे प्रवासात उंदराने तुमचे बूट, सामान वा मौल्यवान साहित्य कुडतरले, तरी त्याची हानीभरपाई रेल्वेकडून मिळू शकते.
३. रेल्वेत चोरी झाल्यास नेमके काय करावे ?
अ. प्रथमतः धावत्या रेल्वेत चोरी झाली की, रेल्वेचे तिकिट तपासनीस (TTE), कोच अटेंडंट (Coach Attendant), रेल्वे सुरक्षा दल (Railway Protection Force – RPF) किंवा रेल्वे पोलीस दल (GRPF) यांना कळवा. ते तुम्हाला तुमच्या चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या वस्तूंची तक्रार करण्यास साहाय्य करतील.
आ. तुम्ही रेल्वे सुरक्षा दल (RPF) किंवा तिकिट तपासनीस (TTE) यांच्याकडून प्रथम माहिती अहवाल (FIR) फॉर्म घेऊन तो भरा. रेल्वेमध्येच तक्रार नोंदवण्याची सोय आहे. त्यामुळे फॉर्म भरून झाल्यावर फॉर्म देणार्या व्यक्तीकडे तो जमा करा, म्हणजे तुमची तक्रार नोंदवली जाईल. तुमची तक्रार नजीकच्या रेल्वे पोलीस दलाच्या (GRPF) पोलीस ठाण्यात पाठवली जाईल. यात लक्षात घेतले पाहिजे की, रेल्वेतील प्रवाशांच्या सामानाची चोरी झाल्यास रेल्वे पोलीस दलाकडे, म्हणजे जी.आर्.पी.एफ्.कडे (GRPF) कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
इ. रेल्वेत सामानाची चोरी झाल्यास प्रथम माहिती अहवाल दाखल (FIR) करण्यासाठी प्रवाशाने प्रवास सोडून रेल्वेस्थानकावर उतरणे आवश्यक नाही. तुम्ही चालत्या रेल्वेतही प्रथम माहिती अहवाल दाखल (FIR) दाखल करू शकता; पण जर परिस्थिती गंभीर असेल आणि प्रवाशांची साक्ष हवी असेल, तर तुम्हाला येणार्या रेल्वेस्थानकावर उतरून रेल्वे पोलीस दलाकडे (GRPF कडे) साक्ष द्यावी लागेल.
ई. आता प्रवासी सहजपणे ऑनलाईन तक्रारीही नोंदवू शकतात. अँड्रॉइड वा आय.ओ.एस्. प्रणाली वापरणार्या भ्रमणभाषधारकांनी गूगल प्लेस्टोर वा अॅपल स्टोर यांवर जाऊन रेल मदद (RailMadad) हे अतस्थळावरही तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. (https://railmadad.indianrailways.gov.in) संकेतस्थळावर तक्रार दाखल केल्यावर हा शून्य-प्रथम माहिती अहवाल (०-FIR) मानला जातो आणि त्याचा तपास त्वरित चालू होतो. शून्य-प्रथम माहिती अहवाल (०-FIR) म्हणजे कोणत्याही पोलीस ठाण्यात हा प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला जातो आणि तो नंतर योग्य त्या पोलीस ठाण्यात हस्तांतरित केला जातो.
उ. या रेल मदद अॅपवर केवळ चोरीच नव्हे, तर अन्य कोणत्याही प्रकारची तक्रार करता येते, उदा. बाथरूम (शौचालय) स्वच्छ नाही, छेडछाडीची घटना किंवा इतर कोणतीही सूचना देऊ शकतो.
ऊ. जर प्रवाशाला ६ मासांत सामान मिळाले नाही, तर तुम्ही ग्राहक मंचाकडे (Consumer forum कडे) तक्रार करू शकता. ग्राहक मंच किमतीचे आकलन करून तुम्हाला तुमचा मोबदला मिळवून देते. ग्राहक मंचाने अनेकदा रेल्वेला दंड करून प्रवाशाला हानीभरपाई मिळवून दिलेली आहे.
४. प्रवासात चोरी टाळण्यासाठी पुढील काळजी घ्या !
अ. प्रवासात शक्यतो स्वतःसह मौल्यवान वस्तू, अधिक रक्कम आदी ठेवू नये. शक्यतो खोटे दागिने घालावेत. भ्रमणसंगणक (लॅपटॉप), काही कारणांमुळे रक्कम, मौल्यवान वस्तू स्वतःजवळ ठेवावी लागत असल्यास अधिक दक्षता घ्यावी.
आ. स्थानकावर किंवा रेल्वेत भ्रमणभाष हाताळतांना विशेष काळजी घ्यावी. शक्य असल्यास रेल्वेत चढतांना आणि उतरतांना भ्रमणभाष (मोबाईल), पैसे किंवा महत्त्वाचे साहित्य खिशात न ठेवता पाठीवरील सॅक किंवा मध्यम आकाराच्या बॅगेत ठेवावे.
इ. प्रवासात गुंगीचे औषध देऊन लुटमारीच्या घटना वाढल्या असल्यामुळे प्रवासात शक्यतो अनोळखी व्यक्तींकडून कोणतेही खाण्याचे किंवा पिण्याचे पदार्थ घेण्याचे टाळावे. प्रवासाला निघतांना घरातून जेवणाचा डबा, कोरडा खाऊ आणि पिण्याचे पाणी समवेत घ्यावे; जेणेकरून बाहेरून काही घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
ई. प्रवासात आसनाच्या खाली साहित्य ठेवतांना सामानाच्या सुरक्षेसाठी बाजारात मोठी साखळी मिळते. सामानाला साखळी आणि छोटे कुलूप लावून ठेवू शकतो.
उ. एकटे असतांना प्रवासात रेल्वे थांबली असतांना प्रसाधनगृहात जाण्यापेक्षा धावत्या रेल्वेत असतांना प्रसाधनगृहात जावे, तसेच मौल्यवान वस्तूंची बॅग स्वतःसह घेऊन जावी. प्रवासात समवेत नातेवाईक किंवा अन्य सहकारी असल्यास प्रसाधनगृहात जातांना त्यांना सांगून जावे.
ऊ. पैसे किंवा महत्त्वाचे साहित्य एकत्र ठेवण्याऐवजी २ – ३ ठिकाणी विभागून ठेवावे.
ए. रेल्वेत लोअर बर्थ (खालचे किंवा खिडकीजवळील आसन) असल्यास रात्री झोपतांना मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही खिडक्या लावून घ्याव्यात. दिवसा रेल्वे थांबलेली असतांना मौल्यवान वस्तू, उदा. भ्रमणभाष, लॅपटॉप, पर्स इत्यादी खिडकीजवळ ठेवू नयेत.
ऐ. प्रवास करतांना आजूबाजूला कोण बसले आहे ?, याचे निरीक्षण करून सतर्कता बाळगावी.
ओ. प्रवास करतांना शक्यतो कागदपत्रांच्या छायांकित (झेरॉक्स) प्रती समवेत बाळगाव्यात. मूळ प्रती ठेवणे आवश्यक असल्यास त्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात.
औ. प्रवास करतांना वयस्कर व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
अं. तुम्हाला काही मौल्यवान वस्तू समवेत न्यायच्या असल्यास प्रवास विमा खरेदी करा आणि त्यात तुमच्या मौल्यवान वस्तूंचा समावेश असल्याची निश्चिती करा. ऑनलाईन रेल्वे तिकिट आरक्षित करतांना त्यात प्रवास विमा (Travel Insurance) हा पर्याय असतो, तो निवडावा. त्याचे शुल्क नाममात्र असते. धावत्या रेल्वेत असतांना अपघात झाला, तर तुम्हाला १० लाख रुपये मिळू शकतात. त्यासाठी विमा काढल्यावर आपल्या ई-मेलवर विमा कंपनीकडून आलेल्या फॉर्ममध्ये नॉमिनीचे (नामनिर्देशिताचे) नाव भरून पाठवले, तरच विमा मिळतो.
देशभरातील ८६४ रेल्वेस्थानके आणि ६ सहस्र ६४६ रेल्वे डब्यांत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवले आहेत. असे असतांनाही जानेवारी ते जून २०२२ या ६ महिन्यांच्या कालावधीत रेल्वेत १ सहस्र ६५५ चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर दरोड्याची संख्या ३८ होती, तसेच प्रवाशांना बेशुद्ध करून त्यांचे सामान लुटण्याचे प्रकारही घडलेले आहेत. केवळ मुंबईमध्ये वर्ष २०२१ मध्ये ६ सहस्र ७२० चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. देशभरात अन्य ठिकाणची आकडेवारी यापेक्षा मोठी असू शकते.
समाजात घडणार्या या घटना हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवतात. जोपर्यंत हिंदु राष्ट्र स्थापन होत नाही, तोपर्यंत उपरोक्त होणारी हानी टाळण्यासाठी काळजी घेणे आपल्या हातात आहे, हे लक्षात घ्या !
– होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.२.२०२३)