खेड – तालुक्यातील भरणे येथे एका घरामध्ये ८३ जीवंत गावठी बाँब सापडले असून पोलिसांनी कल्पेश जाधव या संशयिताला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. ही कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ मार्चच्या सायंकाळी करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भरणे येथील आंबवली मार्गावर संशयित जाधव याच्या घरी धाड टाकली असता हा गावठी बाँबचा साठा आढळून आला. या प्रकरणी आणखी सखोल अन्वेषण चालू असून ‘या गावठी बाँबचा वापर वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी केला जात असतो’, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. काही दिवसांपूर्वी खेड-पन्हाळजे या एस्.टी.च्या चाकाखाली १ बाँब फुटल्याची घटना घडली होती.