खेड न्यायालयाकडून दिलासा
खेड – रत्नागिरीचे माजी पालकमंत्री अधिवक्ता अनिल परब यांना खेड जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. दापोली न्यायदंडाधिकार्यांनी त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्याचा आदेश येथील न्यायालयाने रहित केला आहे. परब यांचे अधिवक्ता सुधीर बुटाला यांनी न्यायालयात प्रविष्ट केलेली पुनर्विलोकन याचिका न्यायालयाने १४ मार्चला निकाली काढली.
अधिवक्ता अनिल परब यांच्या विरोधात दापोली न्यायदंडाधिकारी यांनी पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण रक्षणाच्या कलम ५ आणि ७ अन्वये खटला प्रविष्ट केला होता. या खटल्याविषयी अधिवक्ता सुधीर बुटाला यांनी सत्र न्यायालयात पुनर्विलोकन याचिका प्रविष्ट केली होती.
अधिवक्ता सुधीर बुटाला यांनी केलेल्या युक्तीवादात म्हटले आहे की,
१. कलम ५ अन्वये अनिल परब यांना पक्षकार करण्यात आलेले नव्हते आणि त्यांना निकालाची प्रत पाठवण्यात आली नव्हती. ही गोष्ट फिर्यादीलाही मान्य आहे.
२. कलम ७ अन्वये समुद्रामध्ये दूषित पाणी सोडण्यासंदर्भात कोणताही आरोप अनिल परब यांच्या विरोधात नाही.
३. कलम ५ आणि ७ गैरलागू असून त्यामुळे अनिल परब यांच्या विरोधात नोंद करण्यात आलेला गुन्हा रहित करावा, तसेच दापोलीचे न्यायदंडाधिकार्यांनी दिलेला आदेश रहित करून त्यांना आरोपी म्हणून वगळावे.