सभागृहात मंत्री उपस्थित नसणे हा निर्लज्जपणाचा कळस आणि गलिच्छपणा ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

विधानसभेत मंत्र्यांची पुन्हा अनुपस्थिती, अजित पवार संतापले !

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देण्यासाठी त्या त्या विभागांचे मंत्री उपस्थित नसणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे. केवळ महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची लक्षवेधी झाली. इतर लक्षवेधी सूचनेला उत्तर देण्यासाठी विभागांचे ६ मंत्री अनुपस्थित होते. सत्ताधारी आमदारांना गांभीर्य नाही. हा गलिच्छपणा असून या मंत्र्यांना जनाची नाही, तर मनाचीही लाज वाटत नाही का ?, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. १५ मार्च या दिवशी सकाळी ९.३० वाजता चालू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेला उत्तर देण्यासाठी ७ मंत्री अनुपस्थित असल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप अनावर झाला.

सौजन्य झी 24 तास 

मंत्र्यांना समज देण्यात येईल !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मंत्री उपस्थित नसणे, ही गंभीर गोष्ट आहे. मी याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. १४ मार्च या दिवशी रात्री १ वाजेपर्यंत सभागृह चालले. लक्षवेधी असेल, तर सकाळी उत्तर देण्यासाठी मंत्र्यांना माहिती घेण्यास वेळच मिळत नाही; मात्र आता सुधारणा करण्यात येईल. शक्यतो सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे, असे निर्देश देण्यात येतील. मंत्र्यांना समज देण्यात येईल. आदल्या दिवशी मंत्र्यांना अभ्यास करण्यासाठी लक्षवेधी सूचनेची असुधारित प्रत पाठवण्याची व्यवस्था केली जाईल.’’

मंत्र्यांनी उपस्थित रहायला हवे !

राहुल नार्वेकर

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे. जर त्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत नसेल, तर तो जनतेसमवेत अन्याय ठरेल. मंत्री उपस्थित नसलेल्या गोष्टीची शासन काळजी घेईल. यापुढेही अधिकाअधिक लक्षवेधी घेऊ. मंत्र्यांनी उपस्थित रहायला हवे. अधिवेशनासाठी एकूण २ सहस्र ३७६ लक्षवेधी ऑनलाईन प्राप्त झाल्या आहेत. गेल्या ७-८ दिवसांत ५७ लक्षवेधी चर्चेसाठी घेतल्या आहेत.