आज ९ मार्च २०२३ या दिवशी ‘तुकाराम बीज’ आहे.त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
‘शके १५७१ च्या फाल्गुन कृष्ण द्वितीया या दिवशी जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठगमन केले. संसारात संकटपरंपरा निर्माण झाल्यावर मूळचेच परमार्थप्रणव असलेले संत तुकाराम महाराज परमेश्वराकडे संपूर्ण वळले. भंडार्याच्या डोंगरावर जाऊन संतश्रेष्ठ ज्ञानदेव आणि संत एकनाथ यांच्या वाङ्मयाचे वाचन चालू केल्यावर त्यांचे चित्त निर्मळ झाले. थोड्याच दिवसांत गुरुकृपा होऊन संत तुकाराम महाराजांना अभंगांची स्फूर्ती झाली आणि त्यांच्या तोंडून पाझरणार्या अभंगांच्या गंगेत महाराष्ट्रीय जनता सुखावली. त्यांच्या ३-४ शतकांपूर्वी संत ज्ञानदेवांनी संस्कृतमधील तत्त्वज्ञान मराठीत आणून मोठी कामगिरी केली. ते तत्त्वज्ञान आपल्या अभंगवाणीने भूमीतलावर संत तुकोबांनी आणले. स्वतः परमेश्वराची प्राप्ती करून घेतल्यावर संत तुकोबा ‘उपकारापुरते उरले’ होते. तत्कालीन समाजातील अनिष्ट चाली, ढोंगी, बुवाबाजी करणारे यांवर तीव्र प्रहार करून सामाजसुधारकाचे काम त्यांनी चोखपणे बजावले. केवळ स्वतःचाच मोक्ष साधणारे संत तुकोबा नव्हते, तसेच त्यांंनी सर्वांना वैराग्याचा बोधही दिला नाही, तर ‘प्रपंच हाच हरिरूप मानून निरहंकार वृत्तीने रहावे’, हा भागवत धर्माचा श्रेष्ठ संदेश त्यांनी थेट सामान्य जनतेपर्यंत पोचवला.
संत तुकाराम महाराजांना स्वतःचे कार्य संपल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी आवराआवरीस प्रारंभ केला. फाल्गुन कृष्ण द्वितीया दिवशी कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराज म्हणू लागले –
सकळही माझी बोळवण करा । परतोनी घरा जावें तुम्हीं ॥
आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥
वाढवितां लोभ होईल उसीर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥
– तुकाराम गाथा, अभंग १५९८, ओवी १, ३, आणि ४
अर्थ : संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘सर्वांनी आता मला निरोप द्यावा. आपण सर्वांनी आपापल्या घरी जावे. आता मला माझ्या प्राणेश्वरासह (विठ्ठलासह) जायचे आहे. मी माझे विहित कार्य पूर्ण केले आहे. संसारात मोह वाढवला, तर (मोक्षप्राप्तीला) विलंब होईल. आताच तुमचे चित्त भगवंताच्या ठायी स्थिर करा.’’
सर्व लोक भजनप्रेमांत तल्लीन झाले होते. ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणत जगद़्गुरु संत तुकोबाराय भावावेशात येऊन बघता बघता पांडुरंगाशी एकरूप झाले !’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)