मराठी भाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक ! – अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

कवी केशवसूत स्मारक, मालगुंड (रत्नागिरी)

रत्नागिरी, २८ फेब्रुवारी (जिमाका) – मराठी भाषा ही आपली बोली भाषा असून या भाषेविषयी आपल्याला अभिमान असणे, तसेच सर्वांनी मराठी भाषेचा वापर सर्वत्र करणे आवश्यक आहे, असे उद्गार अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य सचिव शुभांगी साठे यांनी २७ फेब्रुवारीला मालगुंड येथे काढले.

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी जिल्हा मराठी भाषा समिती आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारीला कवी केशवसूत स्मारक, मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज जयंती यांच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी शुभांगी साठे बोलत होत्या.

कवी केशवसूत स्मारक, मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज जयंती यांच्या निमित्त कार्यक्रमात बोलतांना शुभांगी साठे, अपर जिल्हाधिकारी

या वेळी तहसीलदार (सर्वसाधारण) हनुमंत म्हेत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखा अध्यक्षा नलिनी खैर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कवी केशवसूत स्मारक येथे ‘मराठी भाषेचे संवर्धन आणि शासनाची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘मराठी भाषा संवर्धनासाठी लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात्मक स्वरूपात आयोजित करण्यात आले.  यामध्ये पोवाडे, भारुडे, गोंधळ आदी लोककलांचा समावेश होता.

कार्यक्रमांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले कौतुक

रत्नागिरी, २८ फेब्रुवारी (जिमाका) –  राज्यात मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज्यगीत गायनाच्या उत्तम उपक्रमाने मराठी भाषादिनाचा आरंभ आज होत आहे आणि हीच कवीवर्य वि.वा. शिरवाडकर यांना खर्‍या अर्थाने अर्पिलेली आदरांजली आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.

२७ फेब्रुवारीला पोलीस कवायत मैदानात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मराठी भाषा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीत गायन कार्यक्रमाच्या प्रसंगी दूरदृश्यप्रणालीद्वारे सामंत बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार आदी मान्यवर उपस्थित होते.