बिहारमध्ये भूमीच्या वादातून झालेल्या गोळीबारात २ ठार

पाटलीपुत्र (पाटणा) – फतुहा येथील जेठुली या गावात भूमीच्या वादातून झालेल्या गोळीबारात २ जण ठार, तर ४ जण घायाळ झाले. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपी बच्चा राय याचे घर, गोदाम आणि मंगल कार्यालय पेटवून दिले, तसेच तेथे आलेल्या पोलिसांवरही दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

जेठुली या गावातील बच्चा राय आणि चनारिक राय यांच्यात एका आधुनिक व्यायामशाळेची भूमी आणि निवडणूक या सूत्रांवरून वाद चालू आहेत. बच्चा राय हे जेठुली गावच्या प्रमुखाचे पतीही आहेत. अनुमाने ३ कोटी रुपये मूल्य असलेल्या या भूमीवर दोघांचाही डोळा आहे. सध्या ही भूमी बच्चा राय यांच्या कह्यात आहे. त्यावर ते माती टाकत असतांनाच चनारिक राय तेथे आले असता बच्चा राय यांच्या गटाकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात चनारिक राय यांचे नातेवाईक गौतम कुमार (वय २५ वर्षे) आणि रोशन राय (वय १८ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर ४ कुटुंबीय घायाळ झाले.

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची बैठक चालू असतांनाच घडली घटना !

पाटण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या सूत्राविषयी बिहारचे पोलीस महासंचालक आर्.एस्. भट्टी हे १९ फेबु्रवारीला दुपारी अधिकार्‍यांची बैठक घेत होते. तेथून ३० किमी अंतरावर असलेल्या फतुहातील जेठुली गावात वरील घटना घडली.

संपादकीय भूमिका

यावरून बिहारमध्ये पुन्हा जंगलराज निर्माण होत आहे, हेच सिद्ध होते !