‘जानेवारी २०२३ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात अकस्मात् आगमन झाल्याचे पाहून आश्रम परिसर आणि परिसरातील साधक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ‘पुंडलिकाच्या भेटी आले परब्रह्म ।’, असेच सर्व साधकांना वाटले. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमापासून दूर असलेल्या आम्हा साधकरूपी लेकरांच्या उद्धारासाठी श्रीसत्शक्ति मायमाऊली धावून आली’, याची साधकांना जाणीव झाली अन् साधकांची भावजागृती झाली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा चैतन्यरूपी कृपाप्रसाद आश्रमातील सर्व साधकांना देऊन आमची मायमाऊली रामनाथी आश्रमात परतली. साधना गतीने होण्यास चालना देणार्या श्रीसत्शक्ति मातेच्या चरणी शरणागतभावाने कवितारूपी कृतज्ञतापुष्प वहातो.
श्रीसत्शक्तिरूपी (टीप १) चैतन्याची गंगा
आली हो देवद आश्रमी ।
साधकरूपी सुंदर सुगंधी फुले उमलली
सनातनच्या नंदनवनी ॥ १ ॥
श्रीसत्शक्तीने साधकरूपी फुलझाडांना
दिले हो प्रीतीचे खत-पाणी ।
साधकरूपी फुलांचा सडा पडला हो
श्रीसत्शक्तिमातेच्या चरणी ॥ २ ॥
श्रीसत्शक्तीच्या चैतन्याचे किरण पडले हो साधकांवरी ।
साधकांचे स्वभावदोष अन् त्रास (टीप २)
यांचे वृक्ष पडले हो उन्मळूनी ॥ ३ ॥
श्रीसत्शक्तीच्या ब्राह्मतेजाचे किरण पडले हो साधकांवरी ।
दैवी गुणांच्या फुला-फळांनी साधकरूपी
झुडपे गेली हो बहरूनी ॥ ४ ॥
साधना गतीने होण्या हृदयी ठेवूया हो
श्रीसत्शक्ति मातेच्या आठवणी ।
सदैव कृपा असावी आम्हावरी,
प्रार्थना करतो श्रीसत्शक्ति मातेच्या चरणी ॥ ५ ॥
टीप १ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप २ – साधकांना होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल (४.२.२०२३)
|