सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
सोलापूर, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ फेब्रुवारी या दिवशी जयभवानी प्रशालेचे मैदान येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला १८ सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी होण्यासाठी भवानी पेठेतील भाजपचे माजी नगरसेवक श्री. सुरेश (अण्णा) पाटील यांनी पुढाकार घेऊन धर्मकार्यात सहभाग नोंदवला. त्यांनी सभेच्या पूर्वसिद्धतेसाठी मैदानातील स्वच्छता व्यवस्था, पाण्याच्या टँकरची व्यवस्था, तसेच मैदानातील खांबांवर वीजव्यवस्था उपलब्ध करून दिली. यासमवेतच त्यांनी मैदानाच्या शेजारी असलेले मंगल कार्यालयातील सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. (श्री. सुरेश पाटील यांच्यासारखे धर्माप्रती जागरूक धर्मप्रेमी सर्वत्र हवेत ! – संपादक)
श्री. सुरेश पाटील यांना चालण्यास अडचण असूनही त्यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे, यासाठी स्वतः त्यांच्या प्रभागांमध्ये फिरून सभेचा प्रसार केला. त्यांनी सहस्रो हिंदूंपर्यंत सभेचा विषय पोचवला. श्री. पाटील यांनी त्यांच्या संपर्कातील हिंदूंना सभेला येण्यासाठी दूरभाष करून स्मरण करून दिले, तसेच सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारेही सभेचा प्रसार केला. त्यांचे चिरंजीव श्री. बिपीन पाटील यांनीही घोंगडे वस्ती परिसरामध्ये घरोघरी जाऊन सर्व युवक आणि महिला यांना सभेचे निमंत्रण दिले. श्री. सुरेश पाटील आणि त्यांचे चिरंजीव श्री. बिपीन पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे भवानी पेठ परिसरातील हिंदु बांधव सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.