‘चॅट जीपीटी’ : एक वादळ !

‘हे भयावहपणे स्पष्ट झाले आहे की, आपल्या तंत्रज्ञानाने मानवतेला ओलांडले आहे !’ अल्बर्ट आईनस्टाईन या सापेक्षतेचा सिद्धांत मांडणार्‍या प्रतिभावान शास्त्रज्ञाचे हे वक्तव्य आज अधिक प्रकर्षाने अनुभवास येत आहे. दोन दशकांआधीपर्यंत जग हे मानसिकदृष्ट्या भौगोलिक अंतराच्या परिमाणावर साहजिकच दूर होते. ते इंटरनेट म्हणजेच माहितीजालामुळे समीप येत गेले. ‘गूगल’ने जगाला हवी ती माहिती पुरवून मानवाचे आयुष्य अक्षरश: पालटले. ‘फोर जी’ तंत्रज्ञानामुळे तर यामध्ये कमालीचे पालट होऊन ही माहिती मानवाला अत्यंत वेगवान पद्धतीने मिळू लागली. अशातच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ या तंत्रज्ञानामुळे ‘तुम्ही काय शोधता ?’, ‘कशाचा अभ्यास करता ?’, ‘तुमची रूची काय ?’, आदी सूत्रांचा वापर करून तुम्हाला जे आवडते, त्याच स्वरूपाच्या बातम्या, लेख, व्हिडिओ आदी माहिती देण्यास आरंभ झाला. आस्थापने त्यांच्या कार्यक्षेत्राविषयी आवड असणार्‍या लोकांना स्वत:चे संभाव्य ग्राहक बनवण्यासाठी अत्यंत चतुराईने याचा वापर करू लागली. देशांच्या राजकारणातही यामुळे उलथापालथ होऊ लागली.

‘चॅट जीपीटी’ म्हणजे काय ?

Chat GTP

तंत्रज्ञानाची शक्ती कुठपर्यंत कार्य करू शकते ? याचे सर्वाेत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘एआय’ ! आतातर यामध्येही एक क्रांतीकारक वादळ आले आहे. ‘एआय’चाच हा सर्वांत ताजा आविष्कार असून ‘चॅट जीपीटी’ नावाने तो जगासमोर आला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये ‘ओपन एआय’ या सॅन फ्रान्सिस्को येथील अमेरिकी आस्थापनाने ही प्रणाली कार्यान्वित केली आणि पहाता पहाता कोट्यवधी लोकांनी तिचा वापर करण्यास आरंभही केला ! या प्रणालीला तुम्ही कोणताही प्रश्न विचारला, तरी त्याला ती चुटकीसरशी उत्तर देते. आपण एका मानवाशी ज्या प्रकारे संवाद साधतो (‘चॅट’ करतो), हुबेहूब अगदी त्याप्रमाणेच ही प्रणाली आपल्याशी बोलते. किंबहुना आपल्या प्रश्नांना अत्यंत हुशारीने, आश्चर्यकारक आणि प्रसंगी मुत्सद्दीपणाने उत्तरे देते.

‘जीपीटी’ म्हणजे ‘जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्स्फॉर्मर’ ! हा ‘बॉट’ (प्रणाली) एक मोठे ‘लँग्वेज मॉडेल’ असून त्याला विचारलेल्या प्रश्नांना तो सूक्ष्मत्वाने विचार करून उत्तर देतो. ‘लँग्वेज मॉडेल’ हे तंत्रज्ञान त्याला मिळालेल्या प्रश्नांतील शब्द आणि वाक्ये यांच्या क्रमाचा शक्य-अशक्यतेच्या सिद्धांतावर जुळवाजुळव करून त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यास प्रतिसाद देते. ‘मशीन लर्निंग’च्या (यंत्र शिक्षणाच्या) अंतर्गत काही प्रगत प्रणालींची जोड देऊन ‘चॅट जीपीटी’स सूक्ष्मत्व दिले गेले आहे.

वरदान कि अभिशाप ?

सर्वसाधारण जनतेला ‘चॅट जीपीटी’च्या जटील तांत्रिक विषयापेक्षा त्याचे व्यावहारिक स्तरावरील उपयोग आणि तोटे पहाणे आवश्यक आहे. गूगल जिथे आपण शोधत असलेल्या विषयावर नेमकेपणाने माहिती देणार्‍या विविध संकेतस्थळांच्या मार्गिका उपलब्ध करून देते, तिथे ‘चॅट जीपीटी’ आपल्याला कोणत्याही प्रश्नाला आवश्यक शब्दांमध्ये थेट आणि समाधानकारक वाटतील, अशी उत्तरे देते. वर्ष २०२१ नंतरची माहिती या प्रणालीस तितकीशी नसली, तरी यामुळे एखाद्या विषयावर निबंध, पत्र, इ-मेल लिहिणे अत्यंत सहजरित्या शक्य होणार आहे, किंबहुना होत आहे. जागतिक राजकारण, धर्म, दैनंदिन जीवन येथपासून ते अगदी ‘एखादा कायदेशीर खटला कसा लढवायचा ?’, येथपर्यंत ही प्रणाली साहाय्यभूत ठरत आहे. कोणत्याही विषयावरील प्रश्नावर ‘जादूच्या कांडी’प्रमाणे ही प्रणाली आवश्यक माहिती उत्तर रूपाने पुरवते. गेल्या मासात स्टॅनफर्ड विद्यापिठातील १७ टक्के विद्यार्थ्यांनी या प्रणालीचा वापर करून परीक्षा दिली आणि यश संपादन केले. यातून या प्रणालीमुळे मानवी भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याचा किंचितसा प्रत्यय तरी आपणास येऊ शकेल. गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्स यांनी ‘चॅट जीपीटी’ची तुलना ‘इंटरनेट’शी केली आणि ‘ही प्रणाली आपले जग पालटून टाकेल’, असे म्हटले. ‘ओपन एआय’ आस्थापनाने मायक्रोसॉफ्टच्या साहाय्याने ‘चॅट जीपीटी’ बनवल्याने मायक्रोसॉफ्टचा गूगलवर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न यशस्वी होईल, असे आता म्हणणे तसे धाडसीपणाचे ठरेल; परंतु बाल्यावस्थेत असलेल्या या प्रणालीमध्ये निश्चितच आधुनिक मानवी जीवनात क्रांतीकारक पालट घडवून आणण्याची क्षमता आहे, असे म्हणायला हरकत नाही. ‘गूगल’ या महाकाय आस्थापनालाही ही भीती भेडसावू लागली असून वर्ष २०१९ मध्ये गूगलला सोडचिठ्ठी देणार्‍या त्याच्या दोन्ही सहसंस्थापकांना त्याने पुन्हा संपर्क साधला आहे.

कोणत्याही प्रणालीला शेवटी मानवच नियंत्रित करत असतो, हे सत्य विसरता कामा नये. त्यामुळेच त्या मानवाची मानसिकता कशी आहे ? यावर त्या प्रणालीचे कार्य अवलंबून असते. ‘चॅट जीपीटी’ जगातील सर्वच विषय हाताळत असल्याने त्याला मिळणार्‍या दिशेनुसार ती कार्य करील आणि वापरकर्त्यांच्या मनावर स्वत:चा ठसा उमटवेल. आजच्या जगात तंत्रज्ञानाशी संबंधित कोणतीही नवीन गोष्ट उथळ विचारसरणी असणार्‍या युवावर्गाला भुलवते. त्यामुळे ‘चॅट जीपीटी’चा विवेकपूर्ण उपयोग करणे आवश्यक आहे. त्याच्या नैतिक आणि कायदेशीर सीमा पडताळण्याचे दायित्व जागतिक मानवसमुहावर आहे. याचे कारण म्हणजे ‘विकिपीडिया’ हे ऑनलाईन विश्वकोश अथवा ‘ट्विटर’ हे सामाजिक माध्यम ज्या प्रकारे साम्यवाद्यांच्या कचाट्यात सापडले, त्याप्रमाणे याची गत होता कामा नये. तसे झाले, तर त्याचा महाविनाशकारी परिणाम पहावयास मिळेल, हे निश्चित ! ‘ॲपल’चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांनी म्हटलेच आहे, ‘तंत्रज्ञानावरील विश्वासापेक्षा लोकांवरील विश्वासाला अधिक महत्त्व आहे !’ ‘चॅट जीपीटी’ हे क्रांतीकारक वादळ यावर खरे उतरेल का, हे त्यामुळेच पहाणे आवश्यक असणार आहे !