पुणे पोलिसांकडून वर्ष २०२२ मध्‍ये जप्‍त केलेल्‍या अमली पदार्थांचा साठा नष्‍ट

पुणे – शहरातील अमली पदार्थांची तस्‍करी करणार्‍यांकडून वर्ष २०२२ मध्‍ये जप्‍त केलेल्‍या ७६१ किलो अमली पदार्थांना आग लावून पोलिसांकडून ते भस्‍मसात् करण्‍यात आले. त्‍यात गांजा, कोकेन, मेफेड्रोन, चरस, हेरॉइन अशा अमली पदार्थांचा समावेश आहे. ४ कोटी १० लाख रुपये मूल्‍याचे अमली पदार्थ रांजणगाव येथील एम्.ई.पी.एल्. या आस्‍थापनाच्‍या भट्टीमध्‍ये टाकून जाळण्‍यात आले. या वेळी पोलीसदलातील वरिष्‍ठ अधिकारी, महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभाग आणि रासायनिक प्रयोगशाळा येथील अधिकारी उपस्‍थित होते.

पोलीस आयुक्‍त रितेश कुमार म्‍हणाले की, तस्‍करांकडून तेलंगाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्‍यप्रदेश या राज्‍यांतून शहरात अधिक प्रमाणामध्‍ये गांजाची तस्‍करी केली जाते. ही टोळी सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करून अमली पदार्थांची तस्‍करी करते.