देशासाठी हौतात्‍म्‍य पत्‍करूनही कर्तव्‍य बजावणारे महावीर जसवंतसिंह रावत !

आपली भारतमाता वीर प्रसवा आहे. हिंदुस्‍थानच्‍या लक्षावधी वर्षांच्‍या इतिहासात अनेक शूरविरांनी आपल्‍या पराक्रमाने शत्रूच्‍या नाकीनऊ आणले. अनेकांनी शत्रूशी लढतांना स्‍वतःचे प्राण गमावले. अशा असंख्‍य विरांची परंपरा, त्‍यांचा वारसा आजही जतन करणारे शूरवीर आपल्‍याला आढळतात. या अर्वाचीन काळात पृथ्‍वीराज चव्‍हाण, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभु देशपांडे, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, पहिले बाजीराव, नानासाहेब पेशवे, तात्‍या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, काश्‍मीरची कोटा राणी, कित्तूरची राणी चेन्‍नम्‍मा या विरांची नामावली संपणारी नाही.

देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. त्‍यांचे बलीदान आणि त्‍यांनी केलेला संघर्ष यांमुळेच आपला देश आपण लढून स्‍वतंत्र केला. त्‍यानंतरही आपल्‍या देशावर आपल्‍या शेजारच्‍या राष्‍ट्रांनी आक्रमण केले. त्‍यांच्‍याशी लढून आपल्‍याला आपले देश स्‍वातंत्र्य टिकवावे लागले. या लढायांमध्‍ये अनेक विरांनी आपले प्राण गमावले.

महावीर जसवंतसिंह रावत

१. अंदमानातील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ प्राप्‍त केलेल्‍या २१ सैनिकांची नावे

देशाचे विभाजन होऊन पाकिस्‍तान हा देश हिंदुस्‍थानपासून फुटून वेगळा निघाला आणि स्‍वतंत्र झाला. त्‍याच वेळी म्‍हणजे वर्ष १९४७-४८ मध्‍ये झालेल्‍या युद्धात मेजर सोमनाथ शर्मा, लान्‍स नायक करम सिंह, नायक यदुनाथ सिंह, सेकंड लेफ्‍टनंट राम राघोबा राणे, कंपनी हवालदार मेजर पीरू सिंह शेखावत, ‘संयुक्‍त राष्‍ट्र शांती सेने’च्‍या कारवाईत सहभागी होऊन हौतात्‍म्‍य स्‍वीकारणारे कॅप्‍टन गुरुबचन सिंह सलारिया, वर्ष १९६२ च्‍या हिंदुस्‍थान-चीन युद्धात मेजर धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंह, वर्ष १९६५ च्‍या हिंदुस्‍थान-पाकिस्‍तान युद्धात कंपनी क्‍वार्टर मास्‍टर अब्‍दुल हमीद, लेफ्‍टनंट कर्नल अर्देशर तारापोर, वर्ष १९७१ मधील हिंदुस्‍थान-पाकिस्‍तान युद्धात लान्‍स नायक अल्‍बर्ट एक्‍का, फ्‍लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंह शेखों, लेफ्‍टनंट अरुण खेतरपाल, मेजर होशियार सिंह, वर्ष १९८७ मध्‍ये झालेल्‍या सियाचीन संघर्षात नायब सुभेदार बन्‍ना सिंह, यानंतर हिंदुस्‍थानच्‍या शांती सेनेच्‍या कारवाईत मेजर रामस्‍वामी परमेश्‍वरन, वर्ष १९९९ च्‍या कारगिल युद्धात लेफ्‍टनंट मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्रसिंह यादव, रायफलमन संजय कुमार, कॅप्‍टन विक्रम बत्रा अशा भारतमातेच्‍या वीरपुत्रांनी अतुलनीय पराक्रम करून हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. त्‍यांचे शौर्य आणि हौतात्‍म्‍य यांना ‘परमवीर चक्र’ अर्पण करून मानवंदना देण्‍यात आली. एवढेच नाही, तर आता या ‘परमवीर चक्र’ अर्पण केलेल्‍या वीर सैनिकांची नावे अंदमानातील २१ बेटांना देण्‍यात आली आहेत.

२. जसवंतसिंह रावत यांची माहिती

१९ ऑगस्‍ट १९४१ या दिवशी जसवंत यांचा जन्‍म उत्तराखंडातील पवडी गढवाल जिल्‍ह्यातील बदयू या गावात झाला. वयाच्‍या १९ व्‍या वर्षी म्‍हणजे १९ ऑगस्‍ट १९६० मध्‍ये हिंदुस्‍थानच्‍या सैन्‍यात ‘रायफलमन’ म्‍हणून ते भरती झाले. वर्ष १९६२ मध्‍ये चीनबरोबर झालेल्‍या युद्धात ७२ घंटे म्‍हणजेच ३ दिवस झुंज देऊन रायफलमन महावीर जसवंतसिंह रावत या शूरविराने ३०० हून अधिक चिनी सैनिकांना कंठस्नान घातले.

३. चीनने अरुणाचल प्रदेश कह्यात घेण्‍यासाठी केलेले आक्रमण

वर्ष १९६२ मध्‍ये चीनने अरुणाचल प्रदेश कह्यात घेण्‍यासाठी आक्रमण केले. आपल्‍या वीर सैनिकांनी चीनचे हे आक्रमण परतवून लावले. चिनी सैनिकांनी तीनदा आक्रमण करून तेथील भूमी कह्यात घेण्‍याचा अयशस्‍वी प्रयत्न केला. त्‍यानंतर चिनी सैनिकांनी १७ नोव्‍हेंबर १९६२ या दिवशी चौथे आणि जोरदार आक्रमण केले. आपले वीर सैनिक चिनी सैनिकांशी समुद्रसपाटीपासून १४ सहस्र फूट उंचीवर लढत होते. तेथील हिंदुस्‍थान-चीन सीमेचा सुमारे १ सहस्र किलोमीटर लांबीचा भूभाग रणक्षेत्रात परिवर्तित झाला. भारतीय सैनिकांकडे पुरेसे शस्‍त्रबळ नव्‍हते. आवश्‍यक तेवढी रसदही आपल्‍या सैन्‍याला मिळू शकली नाही. अशा परिस्‍थितीत आपल्‍या सैनिकांनी चिनी सैनिकांशी युद्ध करणे अत्‍यंत धोक्‍याचे होते. म्‍हणून सेनाधिकार्‍यांनी युद्ध क्षेत्रात असलेल्‍या ‘गढवाल रायफल्‍स’च्‍या चौथ्‍या बटालियनला माघारी बोलावले.

श्री. दुर्गेश परुळकर

४. रायफलमन जसवंतसिंह, गोपाल सिंह आणि लान्‍स नायक त्रिलोक सिंह यांनी रचलेला इतिहास

तथापि परिस्‍थिती पूर्णपणे पालटली होती. आता तेथील भूमी सोडून माघारी परत जाणे, म्‍हणजे आपल्‍या देशाची भूमी शत्रूला कह्यात घेण्‍यासाठी संधी उपलब्‍ध करून देणे होते. ही गोष्‍ट लक्षात घेऊन गढवाल रायफल्‍सचे रायफलमन जसवंतसिंह, गोपाल सिंह आणि लान्‍स नायक त्रिलोक सिंह या ३ रणवीरांनी स्‍वतःची चौकी सोडून माघार घेण्‍यास नकार दिला.

चिनी सैन्‍याशी प्राणपणाने लढणार्‍या या ३ रणविरांनी एक नवा इतिहास रचला. शत्रूची संख्‍या अधिक आणि एका हाताच्‍या बोटावर मोजता येतील एवढे आपले सैनिक ! आपल्‍या विरांनी झाडांच्‍या मागे लपून शत्रू सैन्‍यावर गोळीबार करायला आरंभ केला. लपतछपत हे सैनिक शत्रू सैन्‍याच्‍या बंकरजवळ जाऊन पोचले. तेथून सुमारे १० मीटर अंतरावर असलेल्‍या बंकरवर त्‍यांनी हातबाँब फेकले. या आक्रमणामुळे अनेक शत्रू मारले गेले. आपल्‍या या वीर सैनिकांनी त्‍या बंकरमध्‍ये घुसून शत्रूच्‍या मशीनगन आपल्‍या कह्यात घेतल्‍या. लान्‍स नायक त्रिलोक सिंह आणि रायफलमन गोपाल भूमीवरून रांगत आपल्‍या देशाच्‍या हद्दीत येत असतांना चिनी सैनिकांनी केलेल्‍या गोळीबारात दोघेही कामी (हुतात्‍मा) आले.

५. जसवंतसिंह यांनी चिनी सैनिकांशी ७२ घंटे लढून केलेली अतुलनीय कामगिरी !

जसवंतसिंह मशीनगन घेऊन आपल्‍या बंकरमध्‍ये येऊन पोचले. तेही घायाळ झाले होते; पण त्‍यानंतरही त्‍यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. रायफलमन जसवंतसिंह रावत यांनी नुरा आणि सेला नावाच्‍या दोन स्‍थानिक रहिवासी तरुणींच्‍या साहाय्‍याने एक फायरिंग ग्राऊंड सिद्ध केले. त्‍यांनी ३ ठिकाणी १-१ मशीनगन ठेवली. आळीपाळीने या तीनही मशीनगनमधून त्‍यांनी फायरिंग करायला आरंभ केला. त्‍यामुळे शत्रू सैन्‍याला वाटले की, तिन्‍ही ठिकाणाहून गोळीबार केला जात आहे, त्‍याअर्थी तिथे अनेक सैनिक आहेत. अशा प्रकारे सुमारे ७२ घंटे चिनी सैनिकांशी लढून त्‍यांनी ३०० चिनी सैनिकांना कंठस्नान घातले. त्‍यांच्‍या या रणनीतीमुळे शत्रूसैन्‍य गोंधळात पडले; पण दुर्दैवाची गोष्‍ट म्‍हणजे नुरा नावाची तरुणी जसवंतसिंह रावत यांना रसद पुरवत असतांना चिनी सैनिकांच्‍या हाती सापडली. चिनी सैनिकांनी तिला अनंत यातना दिल्‍या. त्‍यांनी केलेल्‍या छळाला बळी पडून तिने जसवंतसिंह रावत यांच्‍याविषयीची सर्व माहिती चिनी सैनिकांना दिली.

६. जसवंतसिंह यांनी केलेले सर्वोच्‍च बलीदान आणि चिनी सैनिकांचे क्रौर्य

चिनी सैनिकांनी जसवंतसिंह यांना चारही बाजूने घेरले आणि त्‍यांच्‍यावर आक्रमण केले. या आक्रमणात जसवंतसिंह यांना साहाय्‍य करणारी सेला नावाची दुसरी युवतीही मारली गेली. चिनी सैनिकांच्‍या हातून आपण आता वाचत नाही, हे लक्षात येताच जसवंतसिंह रावत यांनी त्‍यांच्‍याजवळ असलेली शेवटची गोळी स्‍वतःवर झाडून घेतली. अशा प्रकारे सर्वोच्‍च बलीदान देऊन त्‍यांनी आपल्‍या मातृभूमीचे रक्षण केले. यावर चिनी सैनिकांनी संतप्‍त होऊन मृत्‍यूच्‍या अधीन झालेल्‍या जसवंतसिंह रावत यांचे मस्‍तक छाटून स्‍वतःसह नेले.

७. हिंदुस्‍थान सरकारने जसवंतसिंह आणि अन्‍य २ सैनिकांचा केलेला सन्‍मान

२० नोव्‍हेंबर १९६२ या दिवशी हिंदुस्‍थान-चीन युद्ध समाप्‍तीची घोषणा करण्‍यात आली. युद्ध थांबवण्‍यात आले असले, तरीसुद्धा चिनी सैनिक जसवंतसिंह रावत यांच्‍या शौर्याने प्रभावित झाले होते. चिनी सैन्‍याने त्‍यांचे मस्‍तक परत केले. एवढेच नव्‍हे, तर त्‍यांची कांस्‍य धातूची मूर्ती सिद्ध करून हिंदुस्‍थानच्‍या सैन्‍याला भेट दिली. हिंदुस्‍थान सरकारने जसवंतसिंह रावत यांना ‘महावीर चक्र’ देऊन सन्‍मानित केले, तर त्रिलोक सिंह आणि गोपाल सिंह यांना ‘वीरचक्र’ देऊन सन्‍मानित करण्‍यात आले.

८. सैन्‍यात बलीदानानंतरही पदोन्‍नती मिळणारे एकमेव सैनिक जसवंतसिंह रावत !

जसवंतसिंह रावत हे हिंदुस्‍थानच्‍या सेनेतील असे एकमेव सैनिक आहेत की, त्‍यांनी बलीदान दिल्‍यानंतरही त्‍यांना पदोन्‍नती देण्‍यात येते. ‘नायक’, ‘कॅप्‍टन’ अशी विविध पदे त्‍यांना बहाल करण्‍यात आली असून आता ते मेजर जनरल आहेत. त्‍यांच्‍या परिवारात कुणाचा विवाह किंवा एखादे धार्मिक कार्य असेल, तर त्‍यांच्‍या परिवाराकडून त्‍यांना सुट्टी मिळावी म्‍हणून आवेदन पत्र पाठवले जाते. त्‍याची नोंद घेऊन सैनिक त्‍यांचे छायाचित्र असलेली प्रतिमा घेऊन सन्‍मानपूर्वक त्‍यांच्‍या गावी जातात. त्‍यांची सुट्टी संपली की, त्‍यांच्‍या घरी जाऊन त्‍यांची ती प्रतिमा घेऊन परत येतात आणि पुन्‍हा ती त्‍यांच्‍या कार्यस्‍थळी स्‍थापन करतात. त्‍यांना आजही मानसन्‍मान दिला जातो. ते ‘जसवंतबाबा’ म्‍हणून आता ओळखले जातात. संपूर्ण गाव त्‍यांची पूजा करते.

९. महावीर जसवंतसिंह रावत बलीदानानंतर आजही कार्यरत !

‘महावीर जसवंतसिंह रावत हे आजही आपले काम करत आहेत. आपले कर्तव्‍य बजावत आहेत. त्‍यांचा आत्‍मा आज तिथे वावरत आहे’, असे काही जणांना जाणवत आहे. एवढेच नव्‍हे, तर ते भारतीय सैनिकांना मार्गदर्शन करतात. त्‍यांच्‍या नावामागे ‘मृत’, ‘स्‍वर्गीय’, ‘हुतात्‍मा’ अशा कोणत्‍याही उपाध्‍या लावल्‍या जात नाहीत. त्‍यांच्‍या खोलीची देखरेख ठेवण्‍यासाठी आजही ५ सैनिक नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. त्‍यांचा गणवेश इस्‍त्री करून, तर त्‍यांचा पलंग आजही व्‍यवस्‍थितपणे ठेवला जातो. त्‍यांच्‍या बुटांना पॉलीश करून ठेवण्‍यात येते. पहाटे ४.३० वाजता त्‍यांच्‍यासाठी चहा, सकाळी ९ वाजता न्‍याहारी आणि संध्‍याकाळी ७ वाजता त्‍यांना रात्रीचे जेवणही दिले जाते. देशासाठी हौतात्‍म्‍य पत्‍करून देहत्‍यागानंतर असा सन्‍मान मिळवणारा हा भारतमातेचा सुपुत्र जगात एकमेव असेल ! या एकमेवाद्वितीय महावीराला सन्‍मानपूर्वक वंदन !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.१.२०२३)