मळेवाड येथे गडाचे नाव असलेल्या ‘रिसॉर्ट’मध्ये बीअर बारसाठी अनुमती मागितली !

अनुमती न देण्याची ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’सह ग्रामस्थांची मागणी


सावंतवाडी – तालुक्यातील मळेवाड येथे चालू झालेल्या एका रिसॉर्टला ऐतिहासिक वारसा असलेल्या एका गडाचे नाव देण्यात आले आहे. या रिसॉर्टमध्ये बीअर बार चालू करण्यासाठी अनुमती देऊ नये, अशी मागणी मळेवाड-कोंडूरे येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेसह ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच हेमंत मराठे यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, या ‘रिसॉर्ट’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर जगभरात त्यांच्या पराक्रमांसह आचार-विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा वारसा असलेल्या गडाचे नाव असलेल्या रिसॉर्टमध्ये बीअर बारला अनुमती दिल्यास ती छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांची पायमल्ली ठरेल आणि प्रसंगी महाराष्ट्र पेटून उठण्यास वेळ लागणार नाही. आम्ही मळेवाड गावातील असंख्य नागरिक शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यामुळे या ‘रिसॉर्ट’मध्ये बीअर बार चालू करण्यासाठी मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीने ‘ना हरकत’ दाखला देऊ नये.
या निवेदनाविषयी ग्रामसभेत माहिती देऊन त्यावर चर्चा केली जाणार आहे, असे उपसरपंच मराठे यांनी या वेळी सांगितले. या निवेदनाची प्रत सावंतवाडी पोलीस ठाणे आणि सिंधुदुर्ग एक्साईज कार्यालय येथे देण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.