पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – येथील ‘वडगाव विद्यालय-वडगाव ज्युनिअर कॉलेज’च्या मैदानावर २२ जानेवारीला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी जिज्ञासू, धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. वेदपुरोहित श्री. सागर वाळिंबे आणि श्री. गिरीष देशपांडे यांनी वेदमंत्रपठण केले. हिदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. बाबासाहेब भोपळे यांनी केले. या सभेसाठी १ सहस्र ४०० हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते.
धर्मवीरांचा सत्कार – सातत्याने राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सहभागी असणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. धनंजय गोंदकर आणि श्री. राजेंद्र बुरुड, तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. राजेंद्र जाधव यांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवर – सनातनच्या संत पू. (डॉ.) श्रीमती शरदिनी कोरे, नगराध्यक्ष श्री. मोहन माळी, प्रतिष्ठीत व्यापारी श्री. नंदकुमार बेलेकर, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. जगदिश कुडाळकर आणि श्री. राजेंद्र जाधव, शिवसेनेचे (शिंदे गटाचे) श्री. अंकुश माने आणि श्री. सुनील माने, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. मनोहर काटकर, अभियंता श्री. महेश पाटील, बांधकाम व्यावसायिक श्री. चंद्रकात नेर्लेकर यांसह पेठवडगाव येथील प्रतिष्ठीत व्यापारीवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
हिंदूबहुल देशात अल्पसंख्यांकांना लाभ, तर हिंदूंवर अन्याय ही स्थिती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – आज भारतात इस्लाम आणि ख्रिस्ती, तसेच अन्य अल्पसंख्यांक पंथांना विशेष संरक्षण दिले गेले आहे; पण देशातील बहुसंख्यांकांच्या, म्हणजेच हिंदु धर्माला कोणतेही राजकीय संरक्षण प्राप्त नाही. त्यामुळे भारतात अल्पसंख्यांकांच्या विरुद्ध अन्याय घडल्यास ‘अल्पसंख्यांक आयोग’ असतो. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘अल्पसंख्यांक विकास मंत्रालय’ असते किंवा ‘सच्चर आयोग’ आदी बनवले जातात. बहुसंख्यांक हिंदूंना मात्र कुठलेही राजकीय संरक्षण नसल्याने ना त्यांच्या अन्यायाविषयी ‘बहुसंख्यांक आयोग’ आहे, ना त्यांच्या विकासासाठी ‘बहुसंख्यांक विकास मंत्रालय’ आहे. तरी हिंदूबहुल देशात अल्पसंख्यांकांना लाभ, तर हिंदूंवर अन्याय ही स्थिती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
आदर्श राष्ट्राची निर्मिती ही नागरिकांच्या त्यागावर अवलंबून असते ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर
नुकतेच कर्नाटकच्या एका नेत्याने ‘हिंदु’ हा शब्द पारसी आहे, असे म्हटले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघड झाले आहेत. हिंदूंच्या मंदिरांची भूमी परस्पर विक्री केली जात आहे. सेक्युलर सरकार जोपर्यंत हे प्रकार बंद करत नाही, तोपर्यंत हिंदु जनजागृती समिती मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात लढा देत राहील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितले आहे की, कोणत्याही आदर्श राष्ट्राची निर्मिती ही राष्ट्रातील नागरिकांच्या त्यागावर अवलंबून असते. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिदिन वेळ द्या.
पुणे येथे येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचा रस दिला जात होता. अशा प्रकारे हिंदूंची फसवणूक करून धर्मांतरित केले जात आहे. हे थांबवणे प्रत्येक हिंदूचे दायित्व आहे. केवळ हिंदूंच्या सभेमध्ये शांततेत बसता येऊ शकते, हे आज सभेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना लक्षात आले असेल.
‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित पेठ वडगाव येथील हिंदु राष्ट्र जागृती सभा
क्षणचित्रे
१. आळते येथील शिवकन्या प्रतिष्ठानच्या युवती विशेष गणवेशात सभेसाठी उपस्थित होत्या.
२. सभेसाठी भादोले, लाटवडे, भेंडवडे, आळते, पारगाव, मंगराईवाडी, अंबप, वाठार, सावर्डे, मिणचे अशा विविध गावांमधील धर्मप्रेमी सभेसाठी उपस्थित होते.
३. सभेसाठी श्री. अंकुश माने आणि श्री. सुनील माने हे ५० युवकांसह घोषणा देत सभास्थळी उपस्थित झाले.
आभार – सभेसाठी ध्वनीयंत्रणा उपलब्ध करून दिल्याविषयी श्री. निशिकांत सावर्डेकर यांचे, तर वडगाव मंडप असोसिएशनने वीज उपलब्ध करून दिल्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.