ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर नतमस्तक !

ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

आळंदी (जिल्हा पुणे) – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २१ जानेवारी या दिवशी येथील माऊली मंदिरात सदिच्छा भेट घेतली. दर्शनासाठी आल्यानंतर माऊलींचे मंदिर न्याहळून पहतांना अण्णांना जुन्या आठवणी जागृत झाल्याचे भासत होते. मंदिरातील दर्शन घेतल्यानंतर त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. अण्णांच्या शुभहस्ते माऊलीच्या चल पादुकांचे पूजनही करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वारकरी शिक्षण संस्थेत जाऊन शांती ब्रह्म मारुति बाबा कुरेकर यांची भेट घेतली.

त्यांनी चौथ्या वर्गात शिकणार्‍या वारकरी विद्यार्थ्यांना संबोधित केले. आपले विचार मांडत असतांना निष्कलंक चारित्र्य आणि स्वच्छ, निःस्वार्थ जीवन जगत असतांना स्वतःच्या आयुष्याचा लोकांना उपयोग व्हावा, यासाठी कार्यरत रहाण्याचे धडे आपण घ्यावेत अशा भावना समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्या. अण्णांचे उपोषण, आंदोलने यांमुळे युवक सदैव त्यांच्यापासून प्रेरणा घेत राहिला. स्वतःला भूमीत गाडून घेत कणसाचा एक दाणा सहस्रो दाणे सिद्ध करतो. त्याप्रमाणे स्वतःचे आयुष्य लोकांसाठी खर्च करा. त्यामुळे सहस्रों लोकांचे आयुष्य पालटेल ही भावना आजही अण्णांच्या मनी तशीच आहे.