खानापूर (जिल्हा सांगली) – खानापूर येथील भारतीय लष्करातील नायब सुभेदार जयसिंह तथा बाबू शंकर भगत यांच्यावर २१ जानेवारीला खानापूर येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सियाचीन येथील सीमेवर कर्तव्य बजावतांना हिमस्खलनात ते गंभीररित्या घायाळ झाले होते. उपचार चालू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली होती.
हुतात्मा भगत यांचे पार्थिव पहाटे लष्कराच्या विशेष विमानाने लडाखहून पुण्यात पोचले. यानंतर लष्कराच्या वाहनातून हे पार्थिव त्यांच्या खानापूर या मूळगावी पोचवण्यात आले. अंत्ययात्रेच्या प्रसंगी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. ‘भारतमाता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’, अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. राज्य सरकारच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांसह अन्य उपस्थित होते. गावातील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आहेत.
सौजन्य : Dongre photo